अष्टमस्थान व 64 वा नवांश

 

                       💢 अष्टमस्थान व 64 वा नवमांश 💢

कुंडलीच्या 12 भावातील प्रत्येक स्थानांस एक आगळेवेगळे महत्त्व आहे. 6, 8, 12 त्रिकस्थानांपैकी, अष्टमस्थान हे एक अशुभ मानले जाणारे स्थान आहे. या स्थानापासून मृत्यूतुल्य संकटे, चिंता, आजार, गुप्तरोग, सासर, सौभाग्य, सदसद्विवेक बुद्धी, वारसाहक्काने धनलाभ, विना परिश्रमाची संपत्ती,  अकस्मात धनलाभ या बाबी प्रामुख्याने पाहिल्या जातात. या स्थानातून मिळणाऱ्या धनाचा स्त्रोत, मात्र अशुभ असतो.

💢 अशा या अष्टमस्थानाच्या महात्म्यामुळेच, अष्टमेश वा अष्टमस्थानात स्थित असलेल्या ग्रहांच्या दशा - अंतर्दशा जरा खडतरच जातात.

💢या स्थानाचे कारकत्व शनि महाराजांकडे आहे. अष्टमात शनी असता, व्यक्ती  दीर्घायुषी असते. फक्त तो बलवान हवा. हार्ट अटॅकच्या प्रसंगात, जर अष्टमात शनी असेल तर, पहिल्या अटॅकपासून बचाव होतो. अशा प्रकारच्या 2/3 कुंडल्या माझ्या संग्रही आहेत. थोडक्यात, या शनीमुळे झटक्यात मरण न येता, बरेच दिवस बेडवर रेंगाळत राहून मरण येण्याची शक्यता असते. अस्तु.

 यास्थानात शुभग्रह बलवान असता, मिळणारी संपत्ती ही लाभदायी  ठरू शकते. पण त्याचबरोबर, अशुभ बलवान ग्रहाद्वारे मिळणारी संपत्ती,  त्रासदायक असण्याचाहि संभव असू शकतो.   

 सर्वसाधारणपणे यास्थानाचा स्वामी अष्टमेश, ज्याभावात बसला आहे,  तिथे अडचणी, संघर्ष, विलंब  अशी वाईट फळे निर्माण होतात,  तर अष्टमात पडलेले ग्रह,  ते ज्याभावाचे स्वामी आहेत, त्यांच्या व स्वतःच्या कारकत्वाच्या अनुरोधाने, अशुभ फळे देतात. हे स्थान मृत्यूसूचक असल्याने, मारकस्थान आहे.

  💢अष्टमेश अष्टमात असून त्यासोबत जर कष्टेश वा व्ययेश असेल तर, “ सरळ विपरीत राजयोग “ होतो. यामुळे व्यक्ती कठीण प्रसंगातून स्वतःची सोडवणूक करून घेते. परंतु, यायोगासाठी, किंबहुना सर्वच विपरीत योगाच्या फळासाठी, लग्नेश मात्र बलवान असावा लागतो. व यायोगाचे फळ जीवनात , सतत मिळत नसून, फक्त एकदाच मिळते, ही यायोगाची विशेषता आहेतसेच, अष्टमेश जर कष्टस्थानात, कष्टेशासह असेल तर, “ कठीण विपरीत राजयोग ” व व्ययस्थानात, व्ययेशासह जर अष्टमेश असेल, तर “ विमल विपरीत राजयोग “ होतो.

💢 आयुष्ययोग पहातांना, लग्नेश व अष्टमेश हे कोणत्या तत्वाच्या  राशीत आहेत , त्यावरून व्यक्ति अल्पायू , मध्यमायू, की दीर्घायू आहे हे ठरविले जाते.

💢 कुंडलीत लग्नेश, अष्टमेश व तृतीयेश यांचा, युति, प्रतियोग, दृष्टीयोग, अन्योन्ययोग, असला कुठल्याहि प्रकारे येणारा संबंध, हा आयुष्याच्या दृष्टीने, अशुभ मानला जातो. कारण लग्नेश प्रथमस्थानाचे प्रतिनिधित्व करणारा असून,  तृतीयेश हा, अष्टमाच्या अष्टमाचा स्वामी असल्याने, त्याचा अष्टमेशाशी, लग्नेशाशी, संबंध असणे, अशुभसूचक असते.

💢 याबाबत, ज्याकुंडलीत, एखादा ग्रह वरील भावापैकी, दोन भावांचा स्वामी असतो, अशा कुंडल्यांचा, विशेष विचार करायला हवा. उदाहरणार्थ -कन्या लग्नात, मंगळ हा तृतीयेश व अष्टमेश होतो. तर मीन लग्नात, शुक्र अष्टमेश व तृतीयेशाच्या भूमिकेत असतो.

💢 अष्टकवर्गातहि लग्नस्थानापेक्षा, अष्टमस्थानास अधिक गुण असतील तर, आयुष्य कमी असण्याचा संभव असतो. अष्टमस्थानासंबंधी अजून पुष्कळ लिहिता येईल. त्यासाठी एक लेख, पुरेसा ठरत नाही.

💢 64 वा नवांश विचार 💢

 अष्टमस्थानाचा अरिष्टासंबंधी विचार करताना,  कुंडलीचा 64 वा नवांश  अतिशय महत्त्वाचा असतो.

 याला खर नवमांश असेहि म्हणतात. “ खर ” हा शब्द “ खल “ या शब्दाचा अपभ्रंश असावा. खलचा अर्थ दुष्ट किंवा क्रूर असा होतो.

 अष्टमस्थान हे मृत्यूतुल्य कष्ट देणारे अरिष्टाचे स्थान असल्याने, गोचरीने जेव्हा जन्मकुंडलीचा एखादा अकारक ग्रह, अष्टमस्थानातुन व 64 व्या नवांशातून जात असतो, त्यावेळेला जातकास  आरोग्यासंबंधी, घातक पीडा होण्याचा संभव असतो.

 💢 यासाठी, जशी आपल्याला आपली जन्मराशी माहित असते, त्याचप्रमाणे, या 64 व्या नवांशाची सुद्धा माहिती असणे आवश्यक ठरते.  हा 64 वा नवांश कसा पाहता येईल ? हे आपण स्पष्ट करू.

💢 जन्मकुंडलीत असणारा  एखादा ग्रह,  नवमांशकुंडलीत, कोणत्या राशीत आहे?, त्यावरून त्या ग्रहांचे बलाबल ठरत असते. म्हणून, नवांशकुंडलीला अग्रगण्य महत्व आहे.

 💢 एक राशी नऊ नवांशात विभागली जाते. म्हणजे सप्तमस्थानापर्यंत 9×7 = 63 नवांश होतात. व अष्टमस्थानाचा  प्रारंभीचा नवांश  64 वा नवांश असतो.

💢 हा 64 वा नवांश काढण्यासाठी, प्रथम नवमांशकुंडली काढावी.

 नवमांश लग्न, ज्याराशीचे असेल. त्याराशीपासून “ नवांशकोष्टकातील 64 वी राशी “ खर नवमांश होय.

 हे आपण, अजून सोप्या पद्धतीने पाहू शकतो.

💢 नवमांश लग्न जे असेल, त्यात 3 मिळवून जी राशी येईल, ती 64 व्या नवांशाची राशी आहे. ( ही बेरीज 12 पेक्षा अधिक असल्यास, बेरजेतून 12 राशी बजा कराव्या. म्हणजे 64 वा नवांश मिळेल.)

 💢 याहिपेक्षा अधिक सोप्या शब्दात, मूळ नवमांशकुंडलीत, चतुर्थात येणारी राशी ही 64 वा नवांश दर्शवते.

 💢 आता मूळ जन्मकुंडलीच्या अष्टमात जी राशी असेल, त्याराशीतून गोचरिने, त्या जन्मकुंडलीचा एखादा अकारक, मारकग्रह वा शनि, मंगळ, राहू, प्रजापती यासारखा पापग्रह, जर 64 व्या नवांशातून, गोचर भ्रमण करीत असेल तर, त्याकाळात, जातकास संकटाचा सामना करावा लागतो. जीवावर बेतणारे अनिष्ट प्रसंग या काळात घडू शकतात.

💢 हे आता उदाहरणाद्वारे अधिक स्पष्ट करू.

समजा जातकाचे धनु लग्न असेल तर अष्टमात कर्कराशी येईल. जातकाचे धनु लग्न 20 अंश ते 33 कलांवर आहे. म्हणजे त्याची नवमांशकुंडली तुलालग्नाची येणार. या 7 मध्ये 3 मिळवल्यास 10 येतात. म्हणजे 64 वा नवमांश “ मकर “ येतो.


मूळ जन्मकुंडलीत अष्टमस्थानात कर्कराशी आहे. जेव्हा एखादा अकारक ग्रह, मारक ग्रह, वा शनी मंगळ राहू प्रजापती सारखा पापग्रह, गोचरीने कर्कराशीतून भ्रमण करीत असताना ,  तो जेव्हा “ मकर “ नवांशातुन भ्रमण करेल, त्याकाळात तो जातकास आरोग्यविषयक हानी पोहोचवू शकतो. म्हणजेच कर्कराशीतून तो पापग्रह जेव्हा 21 अंश ते 23 अंश 20 कलेतून ( कर्कराशीं - मकरनवांश ) भ्रमण करेल तेव्हा, या भ्रमणकालावधीत जातकास, संकटाचा सामना करावा लागू शकतो. यास खर नवांश संबोधन असल्याने, याकाळात घात - पात, दारुण पीडा संभवतात.

या 64 व्या नावांशाची कार्य व्याप्ती समजण्यासाठी , खालील कुंडलीचा विचार करू. ही एक आत्महत्येची केस आहे.

💢 मूळ जन्मकुंडली

कन्या लग्नाची  ही  मूळ जन्मपत्रिका असून,व्ययेश रवि लग्नी,पुष्कर नवांशात असल्याने, व्ययेश म्हणून बलवान झाला आहे. व्ययेश लग्नी असता, जातकाचे निर्णय चुकतात. हा आयुष्याच्या दृष्टीने, लग्नी असणे, चांगले समजले जात नाही. मनकारक लाभेश चंद्र, व्ययात वर्गोत्तम असला तरी, नवांशात तो हर्षलच्या युतीत आहे. त्यामुळे  स्वभावात सनकी, विक्षिप्त, लहरी, चंचलता हे गुण वाढीस लागतात. तसेच मूळकुंडलीत चंद्र व मंगल हे हर्षल नेपच्युनशी षडाष्टक योग करतात. हा नेपच्यून पुष्कर नवांशात आहे. अष्टमेश मंगल व्ययात चंद्राच्या युतीयोगात आहे. मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हा योग, नकारात्मक प्रभाव देतो.


💢
ज्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली, त्यादिवशीची, वृषभलग्नाची ही कुंडली आहे. मृत्यूकालीन ग्रहयोगाची कुंडली बाजूस दर्शविलेली आहे. मृत्यूकालीन , वृषभ लग्न सिंह नवमांशात होते. व सिंह नवमांश कुंडलीस 22 वा देशक्राण येतो.

💢 मूळ जन्मकुंडलीस अनुसरून, कन्यालग्नाचे गोचर ग्रह पाहिले असता, लग्नेश बुध, अष्टमेश व तृतीयेश मंगळाच्या व व्ययेश रवीच्या  युतीत आहे. त्यात रवि 27 अंशावर मंगळ व बुध  अनुक्रमे, 15 व 18 अंशावर आहेत. लग्नेश अष्टमेश व तृतीयेश हे एकत्र येणे चांगले नाही, याचा आपण वर उल्लेख केलेला आहेच. या तिन्ही ग्रहावर, गोचरीने, अष्टमात आलेल्या प्रजापतीची पूर्णदृष्टी आहे. रवि - हर्षल दृष्टीयोग आत्मबल कमी करणारा,  मंगळ - हर्षल दृष्टीयोग अपघातप्रवण, व बुध- हर्षल  हा अंशात्मक प्रतियोग, बुद्धीस विपरीत चालना देणारा, तसेच कष्टस्थानी असणारा चंद्र - नेपच्यून युतीयोग मानसिकतेवर विपरीत परिणाम करणारा. त्यातहि मूळकुंडलीत पुष्करनवांशात असलेला नेपच्यून, गोचरीनेहि पुष्करनवांशात येतो. जीवनकारक रवि व मानसिक स्थिती कारक चंद्र, हे दोन्ही गोचर स्थितीत दूषित झाल्याने, आत्मबल व मानसिक बल याचे खच्चीकरण झालेले आहे.


💢
अधिक बारकाईने अष्टमातील हर्षलचा विचार केला असता, 18 अंशावरील बुधावर, दृष्टी टाकणारा हर्षलहि त्यावेळी 18 च अंशावर होता.  मेष राशीतील 18 अंशाचे ग्रह, हे कन्या नवांशात येतात.  व कन्या नवमांश हा या पत्रिकेचा 64 वा नवांश आहे . अशा या 64 व्या नवमांशातील हर्षलाची, लग्नेश बुधावर पूर्ण दृष्टी असल्याने, व तत्समयी बुध अस्तंगत असल्याने, व वर सांगितल्यानुसार, रवि मंगळाच्या सानिध्याने, तसेच चंद्र नेपच्यूनच्या प्रभावात असल्याने, ही दुर्दैवी घटना घडून आली. प्रजापती हा आकस्मिक घटनांचा कारक असून, तो 64 व्या नवांशात असल्याने, त्याने रवि बुध व मंगळास कुप्रभावित केले आहे. या पत्रिकेच्या विश्लेषणावरून, अष्टमस्थान, गोचरीने येणारे  अष्टमातील ग्रह, व 64 वा नवांश हे किती महत्त्वाचे ठरतात, याची पूर्ण कल्पना येते.   

== पुंडलिक दाते, अकोला -9421755299




Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अभ्यासार्थ कुंडली