बोल ज्योतिष्य अनुभवाचे- प्रेमप्रकरण
बोल ज्योतिष्य अनुभवाचे
प्रेमप्रकरण
∆ नुकत्याच तारुण्यात प्रवेश करणा-या युवक युवतींसाठी अत्यंत कुतूहलाचा, व पालकां साठी काळजीचा ,असा दुहेरी भूमिका असणारा, प्रेमप्रकरण हा विषय आहे.
अनेक तरूण, तरूणी लाजत- बूजत कां होईना ,पण "माझ्या जीवनात तसलं काही आहे कां? " असं चोरट्या नजरेने विचारतात.
∆ पत्रिकेवरून, या विषयाचा विचार करतांना, प्रेम प्रकरणाचे योग असता ,तसे स्पष्टपणे लक्षात येते. व हे अंदाज, सहसा चुकत नाहीत. मुला मुलींचा विवाह केव्हा होईल? असे विचारावयास आलेल्या पालकांना, उत्तर देण्यापूर्वी, प्रेम प्रकरणाचे वा विवाहाचे, योग आहेत कां ?, हे प्रत्येक ज्योतिष्याने, अग्रक्रमाने, पहायला हवे.
∆ किंबहूना ज्यांना सराव आहे, ते पहातातच. यामुळे विवाहाचे स्वरूप व अवधि, ठरवायला सुलभ होते.
∆ या बाबत नवोदित ज्योतिष्यां साठी, माझ्या अनुभवास आलेली, काही मार्गदर्शक तत्वे,मी नमूद करीत आहे.
∆ सर्वप्रथम (१) जातकाच्या पत्रिकेत रवि बलवान आहे कां ? ते पहावे. कारण,रवि बलवान असता, ती व्यक्ती स्वाभिमानी, आपल्या नांवांस जपणारी असते. जेणेकरून, समाजात अापले नांव बदनाम होईल, अशी कोणतीही कृति, यांना मानवत नाही. कुंडली तील इतर योगांमुळे, प्रेमभावना उमलत असल्यासहि, परस्परात, स्वाभिमान दुखावेल, अशी घटना झाल्यास, प्रेमप्रकरण मोडीत निघते. मुलीकडून प्रेमाचे सूतोवाच होऊन, तिने जर " तू माझ्या आई- वडीलांना विचार "असे सुचवल्या स " तूच तुझ्या पालकांना सांग " अशी मुलाने भूमिका घेतल्याने, प्रेमप्रकरण मोडीत निघाल्याची, बरीच उदाहरणे आहेत.
∆ (२) पत्रिकेत गुरू बलवान आहे कां, तेहि पहाणे महत्वाचे आहे. गुरू बलवान असून,विशेषत: धर्म त्रिकोणात असता, व्यक्ती सात्विक, सत्यवादी, सामाजिक परंपरांचे वहन करणारी, तसेच स्वचारीत्र्यास जपणारी असते. कोणी अंगुली निर्देश केलेला ,यांना खचितच आवडत नाही. यांचे कुंडलीत, प्रेमप्रकरणासाठी ,इतर अनुकूल योग असल्यास, या प्रेम प्रकरणाचे रूपांतर ,समाजमान्य, विधिवत्, आयोजित विवाहात, होऊ शकते. एवढेच काय, सिंह या मानी राशीचा शुक्र असल्यासहि, प्रेमप्रकरणाची शक्यता जवळ जवळ नसते. एखादी अपवादा त्मक केस आढळल्यास ,त्यातही स्वाभिमान अबाधित असतो.
∆ (३) ज्या पत्रिकेत शुक्र- मंगळ युति योग, दृष्टी योग आहे, त्या पत्रिकेत, ही संभावना अधिक असते. समोरील व्यक्तिच्या कुंडली तहि, असेच योग असता, " चुंबकीय "अाकर्षण निर्माण होते. मग ती व्यक्ती, नात्यागोत्यातील असो ,की कार्यालयीन कर्मचारी असो. हा योग ,मी ब-याच पत्रिकां तून अनुभवला आहे. त्यातही शुक्र मंगळ युति असावी पण ती अंशात्मक असू नये. अंशात्मक युति असणारांचे, वैवाहिक जीवन अशांत असते ,असा अनुभव आलेला आहे.
∆ (४) एखाद्या पत्रिकेत असा योग असेल व त्या व्यक्तीच्या जीवनात ,तसे काही झाले नसेल, तर, सहसा अशी परिस्थिती विरळाच सापडते. पण हा योग, निष्प्रभ नसतो. हा योग पत्रिकेच्या ज्या स्थानात असतो, त्या स्थानाशी संबंधित नातेवाईकांच्या, जीवनात तसे घडण्याची शक्यता असते. उदा. पंचमात हा योग असूनहि, तसा अनुभव नसल्यास, विशेषत: प्रथम संततिचे जीवनात,वा तृतीयात असता, धाकट्या भावा-बहीणीचे बाबतीत, तसे घडण्याची शक्यता असते. (या करीता घरातल्या सर्व सभासदांच्या कुंडल्या एकाच वेळी ज्योतिष्यांना दाखवणे फार हितकर असते.
∆ आईवडिलांच्या वा जेष्ठ भावंडांच्या नक्षत्रावर, जर एखादे मूल जन्माला आले असेल तर ,तो जन्म मुळावर आल्या सारखे मानतात. व त्यावर शांती सांगितली जाते. अशावेळी सर्वांच्या पृथक- पृथक वेळी कुंडल्या दाखविल्यास, हे दोष ज्योतिष्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे ,एकाच वेळी ,घरातील सर्व सदस्यांच्या कुंडल्या दाखवणे महत्वाचे असते. ज्यांना याची काहीच कल्पना नसते, असे लोक संतती होत नाही, अशी समस्या असतांनाहि, फक्त पती वा पत्नी एकाचीच ,कुंडली दाखवतात. संतति हा विषय, पतीपत्नी दोघांशी संबंधित असल्याने, दोन्ही कुंडल्या पाहिल्याशिवाय, पाणी कुठे मुरते ,हे लक्षात येत नाही. थोडे विषयांतर झाले खरे ,पण हाहि महत्वाचा मुद्दा आहे. असो. मूळ विषयाकडे वळू.)
∆ कधी कधी ,प्रेमप्रकरणातून आई- वडीलांचा प्रेम विवाह झालेला असतो. तसेच ,त्यांच्या संततिचाहि प्रेमविवाहच होतो, अशा केसेसमध्ये, पालकांच्या पत्रिकेत, हा योग सहसा पंचम स्थानाशी, निगडीत असतो. असे 2/4 पत्रिकांतून पहाण्यात आले आहे. अशी घटना झाल्यास " घराण्याचे संस्कार -दुसरे काय ? "अशी प्रतिक्रिया उमटते.पण तसे काही नसते. ही प्रतिक्रीया केवळ उथळ प्रतिक्रीया म्हटली पाहीजे. अहो! मनुष्यच काय ? कोणताहि प्राणी-पशुपक्षी आपल्या पाल्याची, आपापल्या परीने ,काळजी घेतांना दिसतात मग मनुष्य कां नाही.? प्रत्येक जीव हा दैवाधीन आहे. प्रत्येकाच्या जीवनावर ग्रहता-यांची हुकूमत असते. त्यांच्या संकेतानुसारच, जीवन घडत असते. हे अक्षर सत्य आहे.
∆ पंचमस्थानात जर शुक्र असेल ,तर प्रेम व्यक्त करण्यात ,ती व्यक्ति स्वत: पुढाकार घेते.
∆ हाच शुक्र जर नवमात असेल तर, जोडीदार प्रथम आपले प्रेम व्यक्त करतो.
∆ लग्नी शुक्र असता ,दोघेहि एकाचवेळी प्रेम व्यक्त करायला उत्सुक असतात.
∆ पंचमात जर नेपच्यून असेल तर तो प्रेम प्रकरणास उद्युक्त करणारा ठरतो.
∆ कुंडलीत शुक्र -नेपच्यून नव पंचम योग असेल ,तर प्रेमप्रकरण होण्याची दाट शक्यता असते.
∆ हाच नेपच्यून शुक्राच्या प्रतियुतित असेल ,तर प्रेमप्रकरणात गोंधळ, फसवणूक करणारा ठरतो.
∆ लग्नेश व सप्तमेश परस्पर दृष्टीत असतील वा युतित असतील ,तर प्रेमप्रकरणातून विवाह होऊ शकतो, किंबहुना विवाहापूर्वी ,पती पत्नीने एकमेकांना, पाहिलेले असते.
∆ पंचमेश व सप्तमेश यांची युति असताहि ,प्रेमप्रकरण संभवते . शारिरिक आकर्षणाचे, यात आधिक्य असू शकते.
∆ पंचमेश व लाभेश याची युति, प्रतियुती असताहि ,प्रेमप्रकरण संभवते.
∆ पंचमात प्रजापति असता, प्रेमप्रकरण यशस्वी होईलच ,असे नाही .प्रेम हा एक जुगार ठरू शकतो.
∆ पंचमात शनी असता, प्रेमप्रकरणात यश मिळणे दुरापास्त असते.
∆ पंचमात गुरू असल्यास,व प्रेमप्रकरण असल्यास, चालीरिती नुसार ,आयोजित विवाह होतो. यात पालकांची मर्जी नसली तरीहि, पाल्याच्या प्रेमापोटी वा समाज भीतीमुळे, ते, मान्यता देतात.
∆ हाच गुरू जर तृतीयात असेल तर ,तो प्रेमप्रकरणास पुष्टी देतो. ∆ पंचमेशाचे उच्च राशीत ,राहू असल्यास ,व्यक्तिचे प्रेम प्रकरण असते.
∆ वरील प्रेमप्रकरण योगात, दोन शत्रु असलेले पापग्रह जेव्हा सामील होतात ,तेव्हा ते प्रेमप्रकरण, शेवटपर्यत टिकेलच याची खात्री नसते.
∆ पंचमेशाचे युतित राहू असता, शाखाबाह्य,जाती बाह्य,प्रेमप्रकरण असू शकते.
∆ प्रेमप्रकणाचे हे योग, व्ययस्थानाचा आश्रय घेत असतील तर, बदनामीची भीती जास्त असते. 6,8,12 ही स्थाने अशुभ होत.
∆ या योगात शनी मंगळाचा सहभाग असल्यास ,विवाह जुळण्यापूर्वी ,वर वा वधू ,एका पक्षातील घरात, तीव्र मतभेद वा भांडणे होतात.
∆ ज्यांच्या कुंडलीत बुध मंगळ एकत्र वा परस्पर दृष्टीत असतात, त्यांचा, प्रेम विवाहाचा प्रस्ताव घरात मान्य झालाच पाहीजे असा अट्टहास असतो व तो पूर्ण करण्यासाठी, कोणत्याहि थराला जाण्याची, त्यांची मानसिकता असते. वेळ पडल्यास ,पळून जाऊन लग्न करण्याची, त्यांची तयारी असते.
∆ ज्यांच्या, कुंडलीत चंद्र मंगळ शुक्र एकत्र असतात ,त्यांचे वयात येताच ,लग्न करून दिलेले ,बरे असते.
∆ सप्तमाचा व शनी बुधाचा, कोणत्याहि प्रकारे संबंध आल्यास, विवाह टीकणे अवघड होते.
∆ कुंडलीत गुरू चंद्र युति -दृष्टी योग, शुक्र चंद्र युति- दृष्टी योग, रवि-शुक्र-बुध ही त्रयी असणे, विरह योग मानले गेले आहेत.
∆ पत्रिकेत हे योग असता, प्रेमप्रकरणाचे नकारात्मक परिणाम मिळताना दिसतात.
∆ कुंडलीत शनी चंद्र हे ग्रह अंशात्मक युतिप्रतियोगात असू नये. जीवनात अत्यंत निराश करणारा हा ग्रहयोग आहे. म्हणून यास " वीषयोग " म्हटले आहे. कुठलेही काम करतांना आपण त्यात आपले समाधान पहात असतो. नेमके ते समाधान या वीष योगात मिळत नाही. या ग्रहांचा प्रेम प्रकरणाचे संबंध असो वा नसो. निराशा देण्याकडे या ग्रहाचा कल जास्त असतो.
∆ मागील भागात, जीवनात प्रेमप्रकरण घडविणारे कोणकोणते, ग्रहयोग असतात ? या संबंधी विवेचन केले.
∆ नवोदित ज्योतिष्यांना, मी याद्वारे, असे नम्रपणे सूचित करू इच्छीतो कि, त्यांनी, जे जे त्यांच्या वाचनात आले असेल, त्या त्या ज्योतिष्य सूत्रांचा, विषयवार संग्रह करावा.
∆ शक्यतो स्वहस्ताक्षरात, लिहून काढावे.त्यामुळे चांगले स्मरणात राहते, असा माझा अनुभव आहे. ∆ प्रेमप्रकरण असलेल्या व्यक्तिची कुंडली पहाण्याचा योग आला असता, तो योग कोणत्या ग्रहां मुळे आला ते कळते, त्याचे सतत मनन करावे. या बाबत सिने कलावंत, प्रसिध्द राजकारण पटू, खेळाडू यांच्या कुंडल्याहि नवोदितांसाठी, चांगले अनुभव देणा-या ठरतात.
∆ अशा विशेष अनुभव आलेल्या कुंडल्याचा, लग्नवार व शक्यतो विषयवार, संग्रह करावा.
कालांतराने, त्याची उपयोगिता सिध्द होते. यश संपादनासाठी, या सारखा अनुकूल मार्ग, दुसरा नाही.एकाच ज्योतिष्य विषयक सिध्दांताचा, वेगवेगळ्या कुंडल्या तून, तोच तो प्रत्यय आल्यास, तो सिध्दांताचेे महत्व मनावर ठसते, परिणामी आपला आत्मविश्वास वाढतो व आपली वाटचाल ,योग्य दिशेने चालली आहे, याचे अभूतपूर्व ,समाधान लाभते. एक दिवस असा उगवतो कि, कुंडली आपल्याशी बोलावयास लागते.
याच विषयास अनुसरून प्रेम प्रकरणाच्या कुंडलीचा एक अनुभव नमूद करीत आहे.
∆ पालकांनी फोनवर दिलेल्या तपशीलावरून, तयार केलेल्या पुरूषपत्रिकेत ,कन्या लग्नी शनी असून, वृश्र्चिकेत चंद्र, नेपच्यून, प्रजापती, चतुर्थात बुध, पंचमात रवि, षष्ठात शुक्र केतू, विषयात मंगळ गुरू राहू होते.
∆पंचमेश शनी लग्नी असणे, शुक्र मंगळ दृष्टी योग असून तो राहू, गुरू युक्त असणे, गुरू हा सप्तमेश राहू युक्त व्ययात असणे, व्ययेश रवि पंचमात असणे, चंद्र कुंडली तही चंद्र लग्नेश, मंगळ शुक्रदृष्टित असणे, चंद्र पंचमेश, गुरू व सप्तमेश ,शुक्र परस्पर दृष्टीत असणे, हे सर्व विजातीय प्रेमप्रकरणाचे संकेत होते.
∆,व्ययेश रवि पंचमात, सप्तमेश व्ययात, त्यातून शनीची चंद्रावर दृष्टी,हे योग प्रेमप्रकरणास गालबोट लावणारे असून, सहजासहजी ,यश मिळवून देणारे नव्हते. शुक्र व गुरू, राहू प्रभावात असून, दोन्ही ग्रहांचा ,अनुक्रमे षष्ठ व व्यय स्थानाशी संबंध होता.
∆ परीणामी, जातकाचे प्रेमप्रकरण होईल वा असेल व त्यात वादंग निर्माण होईल या मतावर, मी ठाम झालो.
∆ पालक विवेचना साठी आल्यावर, मी जेव्हा माझा अंदाज सांगितला ,तेव्हा, त्यांना ते मुळीच रुचले नाही. त्यांच्या मतानुसार जातक, हा वर मान करून न चालणारा, बालबोध वळणाचा, तसले संस्कार नसणारा, त्यांच्या घराण्यात ,आतापावेतो, असाकाही, प्रेमप्रकणाचा इतिहास नसलेला, असा होता. असे करण्यास, " माणसात गट्स पाहीजेत, माझ्या मुलात, तसे गट्स नाहीत, अहो ! त्याच्या तर नाकावरची माशीहि उडत नाही आणि आपण हे काय फलीत सांगता आहात? ".
∆ त्यांच्या या आकस्मिक हल्ल्याने मी स्मितीत झालो. त्यांना स्वत:च्या मुलावर एवढा विश्वास होता ,की क्षणभर मला सुध्दा, आपले निदान चुकले की काय?,असे वाटावयास लागले. मी पत्रिकेत पुन्हा निरखून पाहीले. माझी वाटचाल बरोबर होती.
∆ मला एक शंका आली. "आपण दिलेला प्रारंभिक तपशील बरोबर आहे ना ? "मी विचारले. " हो! अगदी बरोबर आहे. ",मला उत्तर मिळाले.
∆ "मग ,माझे म्हणणे पण, बरोबरच आहे". मी निर्वाळा दिला. " माझा विश्वास नाही ".ही त्यांची शेवटची प्रतिक्रीया. त्यानंतर ते निघून गेले.
∆ माझे निदान बरोबर होते, तसे माझे अंतर्मन मला, वारंवार सांगत होते. पालकाचे " त्याकरीता तसे गट्स असावे लागतात याच्या नाकावर ची माशी पण उडत नाही " हा त्यांचा जबर विश्वास, माझ्या स्मृतित, कायमचा कोरला गेला व त्या वाक्यांशाने, ते ,माझ्या चांगलेच लक्षात राहीले.
∆ त्यानंतर, दीड दोन वर्षांनी, एका मुलाची पत्रिका घेऊन, तिच्या विवाहा बाबत विचारण्यासाठी, तेच पालक, माझ्याकडे आले. ती अाणलेली पत्रिका ,कडक मंगळाची होती. सर्वप्रथम, मी या गोष्टीचा उल्लेख केला असता, त्याचा चेहरा चिंताग्रस्त झाला. कारण ती मुलगी, दुसरी तिसरी कोणी नसुन, त्यांच्या मुलाच्या कार्यालयातील कर्मचारी होती व त्यांच्या मुलाच्या, प्रेमात पडली होती. व मुलगा, " लग्न करीन तर हिच्याशीच." असा हट्ट धरून बसला होता.
माझ्या मनात विचार आला, " ......माशी तर उडत नव्हती, मग ती आता उडाली, कशी ?
=वरील लेख आवडल्यास, कृपया खालील कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया कळवा. म्हणजे मला या विषयावर लिहिण्या संबंधी अधिक प्रोत्साहन मिळेल. 🙏🌺
khupach chhan
ReplyDelete