पराधीन आहे जगती

                   💢 पराधीन आहे जगती…. 💢

मनुष्याचा जन्म होऊन जेव्हा तो पृथ्वीतलावर उत्तीर्ण होतो, त्याच वेळेस त्याच्या जीवनाचे संपूर्ण पटकथा राशी, ग्रह, नक्षत्रांच्या भाषेच्या माध्यमातून, ईश्वराने लिहून ठेवलेली असते. मनुष्य जीवनाच्या रंगमंचावर, ग्रहताऱ्यांच्या संकेतानुसार,  आपल्या जीवनात सुखद वा दुखद  घटना घडत असतात. त्या घटना आपल्या आयुष्यात घडाव्यात याकरिता, तशी पोषक परिस्थितीच निर्माण होते. व कळसूत्री बाहुली प्रमाणे मनुष्य त्या घटनांच्या अधीन होतो. "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा ". या गीताच्या ओळी, कुंडलीतील ग्रहस्थिती, व त्यावरून केलेले ज्योतिष शास्त्राचे अंदाजा बाबत शाश्वत ठरतात.

 प्रेमप्रकरण व त्यातील यश- अपयश हा जीवन प्रवाह बदलवणारा, जीवनास कलाटणी देणारा,    एक प्रभावी योग होय.

 जातकाचा जन्म तपशील जर खरा असेल तर, कुंडलीच्या माध्यमातून, त्याच्या जीवनात प्रेम प्रकरणाचे योग आहेत कां ? त्यात त्याला यश मिळेल कां ? कां अपयश मिळेल? प्रेम विवाह होईल कां ?,तो सजातीय, विजातीय, विधर्मी असेल कां ? वैवाहिक सुख कसे असेल? अशा सर्व प्रश्नांची उकल होऊ शकते.

 बरेचदा कुंडलीतील योगा प्रमाणे प्रेमप्रकरण घडते परंतु, त्यात यश येत नाही. त्यामुळे मनुष्याचा अपेक्षाभंग होतो. काही जातक प्रेमभंगाच्या धक्क्यातून सावरतात तर, काही जातक प्रेमभंगाच्या दुःखातून सावरत नाहीत. मानसिकदृष्ट्या खचल्याने, त्यांचे जीवन निरस बनते. तर कधी कधी विवाह वा  विवाहसुख याबद्दल अनास्था निर्माण होते. प्रेमभंगाचे दुःख कसे असते, हे आपण या प्रातिनिधिक 3 कुंडल्यातून पाहणार आहोत.

⚛️ जातिका क्रमांक 1- जन्मतारीख- 2 जुलै, 1968 . जन्मवेळ 22: 30, जन्मस्थळ- नागपुर.

◾️ ही कुंभ लग्नाची कुंडली असून, लग्न बिंदू शततारका या नपुंसक नक्षत्रात आहे. कुंभ लग्न मुळातच विवाहात तडजोड सुचवणारे आहे. ◾️ सप्तमेश रवि व पंचमेश बुध यांची, पंचमातच युती असून, प्रेमाचा कारक शुक्राच्या संनिध आहे. ◾️ शुक्र मंगळ युती व तीहि पंचमात, प्रेमप्रकरणास अत्यंत पोषक ठरते. ◾️ लग्नेश शनीची सप्तमेश रविवर दृष्टी पडते. हे सर्व योग या जातिकेचे प्रेमप्रकरण होणार, हे सुचवितात.

🔼 परंतु त्यासोबतच हे प्रेमप्रकरण अपयशी ठरणार असेहि संकेत कुंडलीत आहेत 🔼 सप्तमेश रवि, मंगळासह पंचमात असून, तो शनीच्या दृष्टीत असल्याने, विवाहात वा प्रेमप्रकरणात अडथळे येणार. 🔼 कुंडलित कुठेहि रवि, बुध, शुक्र ही त्रयी असेल तर, हा विरहयोग असल्याने, प्रेमभंगास कारणीभूत ठरतो. 🔼 शुक्रावर शनीची दृष्टी असणे, हेहि वैवाहिक सुखास विरोध करणारे ठरते. 🔼 सप्तमस्थान व सप्तमेशाशी, शनी बुधाचा संबंध असू नये. त्यामुळे, विवाहात वा प्रेमप्रकरणात फसवणूक होते. 🔼 कन्येचा चंद्र विवाहसुखाच्या दृष्टीने तितकासा शुभ मानत नाहीत. त्यातून तो अष्टमस्थानी, प्रजापतीचे युतीत व राहू व मंगळाचे दृष्टीत आहे. त्यामुळे या जातिकेस मानसिक सुख मिळणार नाही, असे संकेत प्राप्त होतात.


 ⚛️ नवांश कुंडलीत शनि वर्गोत्तम असून, तो मंगळगृही असल्याने, जीवनात संघर्ष दाखवतो. मूळ पंचमेश बुध, नवांशात तुळ राशीत असल्याने, मूळ कुंडलीत असलेले बुध शुक्र युतिसंबंध बलवान झालेले आहेत. नवांश कुंडलीचा पंचमेश चंद्र गुरुगृही असल्याने, तो गुरु चंद्र युतीचे फळ देईल. गुरु चंद्र युती सुद्धा विरहयोग समजली जाते.

⚛️ मूळ पत्रिकेत जेव्हा बुध मंगळाची युती असते तेव्हा, ती जातकास अतिशय हट्टी, कुठल्याहि परिस्थितीत आपले इप्सीत  पूर्ण करण्याची पराकाष्टा करणारी असते. अशा जातकांना अपयश मुळीच सहन होत नाही. सहिष्णुता ही फारच कमी असते. त्यातून चंद्रहि दूषित असल्याने, मानसिक व्याधी निर्माण झाल्यात. व पुन्हा विवाह या विषयात अनास्था निर्माण झाली.


⚛️ अष्टकवर्गाचा विचार केला असता, प्रथमास 34 तर विवाहास फक्त 22 गुण आहेत. ◾️ प्रथमास, रविचे 5 गुण तर, शनीचे 4 गुण आहेत ◾️ सप्तमात मात्र शनीचे 2 गुण व रविचा फक्त  1च गुण आहे. भिन्नाष्टकाचा विचार केला असता. शनीने प्रथमास व सप्तमास गुण दिलेला आहे. मात्र रविने लग्नास गुण दिलेला आहे पण सप्तमास गुण दिलेला नाही.

म्हणजे सर्व दृष्टीने सप्तमस्थान निर्बल झालेले आहे.◾️ प्रेमप्रकरणाच्या दृष्टीने पंचमस्थानाचा विचार केला असता, शुक्राने 4 हे सामान्य गुण, पराक्रमेश मंगळाने तर फक्त 2 गुण  दिलेले आहेत. त्यामुळेहि प्रेमप्रकरण अपयशी झाल्याचे दिसते. 

 

⚛️  कुंडली क्र.2- जातक जन्मतारीख - 22 मे 1995, जन्मवेळ -09:45, जन्मस्थळ- अकोला


◾️ या जातकाचे कर्क लग्न असून, ते वर्गोत्तम आहे. या लग्नाचा सप्तमेश शनी असल्याने, विवाहविलंब व जोडीदारात तडजोड,  हे या लग्नाचे प्रमुख गुणधर्म आहेत. ◾️ कुंडलीत पंचमेश मंगळ व सप्तमेश शनी हे एकमेकांच्या दृष्टीत आहेत ◾️ लग्नेश चंद्र व पंचमेश मंगळ हा दृष्टीयोग प्रेमप्रकरणास पोषक ठरतो ◾️ लग्नेश चंद्र व सप्तमेश शनी यांची युती ही प्रेम प्रकरणाची निर्देशक आहे. ⚛️ चंद्र कुंडलीतहि चंद्रपंचमेश बुध   व चंद्रलाभेश गुरु हे परस्परदृष्टीत आहेत. ◾️ तसेच चंद्राचा पंचमेश बुध व सप्तमेश रवि यांची युती झालेली आहे. ◾️ प्रेमाचा कारक ग्रह शुक्र, हाहि राहूच्या दृष्टीत असल्याने, प्रेमप्रकरण  दर्शवितो.

⚛️ नवांश कुंडलीचा विचार केला असता, मूळ लग्नेश चंद्र, कुंभ नवांशी असल्याने, शनी चंद्र युतीचे तो फळ देईल. मूळ कुंडलित शनी चंद्र, अनुक्रमे, लग्नेश व सप्तमेश आहेत.

🔼 हे प्रेमप्रकरणाचे योग असले तरी, प्रेमप्रकरणात अपयश देणाऱ्या काही बाबी कुंडलीत दिसतातच. 🔼 चंद्र मनाचा कारक असल्याने, तो शनी युतीत असणे, मानसिक नैराश्य देणारा योग आहे. 🔼 हा युती योग अष्टमस्थानी असल्याने , त्याचे कडून शुभफळाची अपेक्षा करता येत नाही. 🔼 लग्न कुंडली व नवमांश  कुंडली या दोन्हीत, पाप ग्रहांचे अधिष्ठान आहे. 🔼 सप्तमातील नेपच्यून वर्गोत्तम, वक्री अवस्थेत  असल्याने, विवाहाचे बाबतीत गोंधळ करणारा तसेच, मूळ कुंडलीतील प्रजापती, आकस्मिक अडचणी आणणारा आहे. 🔼 शुक्र राहुयुक्त असल्याने दूषित समजला जातो. 🔼 मूळ कुंडलीत पंचमेश मंगळ व  सप्तमेश शनी, हे परस्पर कट्टर शत्रू असल्याने ते प्रेमप्रकरणास कारण असले तरी, संघर्षमय स्थिती निर्माण करणारे आहेत.🔼 पंचमात गुरु असता, आयोजितच विवाह होतो. व सर्व संमतीविना, आयोजित विवाह शक्य नसतो. हे गुरु महाराज मूळ कुंडलित, वृश्चिक राशीत असले तरी, नवांश कुंडलीत ते स्वराशीत असल्याने, त्यांचे बल वाढलेले आहे.

🔼 जातकाचे प्रेमप्रकरण असले तरी, स्थिरस्थावर होण्याच्या दृष्टीने, जातकांची लग्नासाठी दोन वर्षे थांबायची मनीषा होती.  परंतु जोडीदाराचा मात्र त्यास नकार होता. त्यामुळे, ते प्रेमप्रकरण असले तरी, त्याची परिणती विवाह न झाल्यामुळे ते अपयशी ठरले. प्रेमप्रकरणातील अपयशास, हे जरी कारण असले तरी, वरील ग्रह योगामुळे, येन-केन प्रकारेण, प्रेमप्रकरणात यश येणारच नव्हते. हे ग्रह स्थितीने अगोदर सुचित केलेले होते.


⚛️ अष्टकवर्गाचा विचार केला असता, जातकाच्या प्रथमस्थानास 28 गुण तर, सप्तमास केवळ 18 गुण आहेत. ◾️ द्वितीय स्थानात 25 गुण असून, भाग्यात 31 गुण आहेत. ही स्थिती सुद्धा जातकास विवाहाच्या प्रथम प्रस्तावात अपयश येऊन, द्वितीय प्रस्तावात त्या तुलनेने, यश देईल असे दर्शविते.  ही स्थिती प्रेमभंगास पोषक म्हणता येईल. ◾️ सर्वाष्टकात लग्नस्थानास लग्नेश चंद्राचे 5 तर सप्तमेश शनीचे 4 गुण आहेत. ही लग्न स्थिती समाधानकारक असली तरी, सप्तम स्थानात मात्र अष्टकवर्गात अडचणी दिसतात. कारण सप्तमस्थानाचे 18 गुण तसेच कमी आहेत, व त्यात चंद्र व शनिने प्रत्येकी फक्त 2 गुण दिलेले आहेत. ◾️ भिन्नाष्टकाचा विचार केला असता, शनि व चंद्र या दोघांनीहि स्वतःचे सप्तमस्थानात गुण दिलेले नाहीत. एकूण सर्व दृष्टीने सप्तम स्थान अष्टकवर्गात निर्बल ठरलेले आहे.

                     ⚛️आज मितिस, जातकाचे वय 27 वर्ष 7 महिने असल्याने, व सप्तमेश शनी असल्याने, ज्योतिष शास्त्रीय दृष्ट्या विवाहास वेळ लागणारच. हे प्रेमप्रकरण अयशस्वी झाल्याने, हा प्रथम प्रस्ताव समजून त्यात अपयश आले.  म्हणजे पुढे, जातकास वैवाहिक सुखात अडचणी येणार नाही, असे म्हणावयास हरकत नसावी.


कुंडली क्र. 3 – जातिका जन्मतारीख - 27 नोव्हेंबर 1984, जन्म वेळ -08:35 जन्मस्थळ- अकोला.


◾️ या जातिकेची धनु लग्नाची पत्रिका असून लग्नबिंदू मूळ नक्षत्रात आहे. तसेच धनु ही द्विस्वभाव राशी असल्याने, कुंडलित इतर पुनर्विवाहाचे योग असल्यास, दिस्वभाव राशी त्यास समर्थक ठरतात. ◾️ लग्नेश गुरु लग्नीच असून, सप्तमेश बुधाच्या युतीत आहे. हा योग प्रेमप्रकरणास पोषक आहे. त्यासोबत प्रेमाचा कारक शुक्रहि असल्याने, शक्यता अधिक बळावलेली आहे. या सर्व कारणामुळे जातिकेच्या जीवनात प्रेमप्रकरण होते, हे निदर्शनास येते. 🔼 जसे कुंडलीत प्रेमप्रकरणास पोषक योग आहेत तसेच, ते असफल होणार, अशी सुद्धा ग्रहस्थिती निर्माण झाली आहे. 🔼 धनु लग्न द्विस्वभाव राशीचे आहे 🔼 सप्तमेश बुध, क्रूर नक्षत्रात, प्रेमाच्या कारक शुक्राबरोबर असून, क्रूर नक्षत्रातील, भ्रम, फसवणूक, गोंधळ याचा कारक असलेला नेपच्यूनहि लग्नस्थानात आहे. त्यामुळे या प्रेमप्रकरणात फसवणूक होणार, असे संकेत मिळतात. 🔼 सप्तमेश लग्नी असला तरीहि, तो रवि, मंगळ प्रजापतीच्या पापकर्तरीत आहे. 🔼 विवाह स्वामीशी शनि बुधाचा संबंध असल्यास, विवाहात व वैवाहिक सुखात फसवणूक होते. 🔼 शुक्रावर शनीची दृष्टी असल्याने, प्रेमप्रकरण वा  विवाहात अडचणी निर्माण होतात. 🔼 स्त्रीच्या पत्रिकेत जर रवि बलवान नसेल  तर, तिला पतीकडून व जोडीदाराकडून अपमानास्पद वागणूक मिळते. 🔼 लग्नस्थानी स्वरशीचा गुरु दिसत असला तरी, नवांशात तो शत्रूराशीत आहे. 🔼 तसेच रवि नवांशात, नीच राशीत आहे.🔼 मूळ कुंडलीत रवि व्यय स्थानी, राहू व हर्षलने पीडित असल्याने जातिकेचे रविबल गेले आहे. 🔼 मूळ शुक्र नवांशात स्वराशीत असून, रवि, गुरु, स्वराशी  शुक्र हे, नवांशाच्या कष्टस्थानी विराजमान असल्याने, भावना नियंत्रित करणे कठीण जाते  . 🔼 मूळ सप्तमेश बुध नवांशात, मेष राशीत असल्याने, बुध मंगळ युतीप्रमाणे विवाहाचे फल मिळेल. मूळ कुंडलीत बुध व मंगळ  हे अनुक्रमे, सप्तमेश व पंचमेश आहेत. नवांशकुंडली सुद्धा प्रेमप्रकरण होणार असे दर्शविते. 🔼 नवांशातहि बुध गुरुचा दृष्टीयोग आहे.


⚛️अष्टकवर्गाचा विचार करता, लग्नस्थानी 29 गुण असून, विवाहस्थानी 23 गुण आहेत. सप्तमाचे गुण कमी आहेत. ◾️ लग्नस्थानी लग्नेश गुरुने 5 व सप्तमेश बुधाने  फक्त 3 गुण दिलेले आहेत ◾️ विवाहस्थानात लग्नेश गुरुने 3, तर सप्तमेश बुधाने फक्त 2 गुण दिलेले आहेत. ◾️ सप्तमस्थान सर्व दृष्टीने निर्बल झालेले आहे.◾️ जरी विवाह झाला नाही, तरी विवाहसुख पहावयाचे झाल्यास, सप्तमस्थानाचे गुण + सप्तमेश स्थित  स्थानाचे गुण + मंगळ स्थित स्थानाचे गुण यांची बेरीज, केवळ 73 भरते. सरासरी 84 च्या तुलनेत, ही कमी आहे. परिणामी, प्रेमप्रकरण हे, सर्वस्व गमावून,  केवळ प्रेम प्रकरणच राहिले. विवाह तर झालाच नाही. विवाहपूर्व परित्यक्ता, असे जातिकेचे वर्णन करता येईल.

💢 थोडक्यात,, जसे जीवनात काही सुखद योग असतात तसेच, दुःखद योगहि असतात. ग्रहगोचर, व दशादि निर्धारित वेळे नुसार,  ते आपल्या जीवनात, त्यांचा प्रभाव दाखवतात. सर्व घटनांची सूत्रे ग्रहस्थितीच्या हातात असल्यामुळे, मानवी जीवन, प्रारब्धात असलेल्या ग्रहस्थितीच्या हातात असते. व त्यांच्या निर्देशानुसार, आपले जीवनक्रमण असते. म्हणूनच, प्रसिद्ध गीताच्या  या ओळी आपल्या अंतर्मनात घुमत राहतात,   “पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा.”

                                      = हा लेख "भविष्य   दर्पण मासिक फेब्रुवारी 2023 मध्ये प्रकाशित झाला आहे.


Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली