प्रभाव अष्टम स्थानाचा




प्रभाव अष्टम स्थानाचा  :


  ▪️  जन्मकुंडली हा एक असा रहस्यमय नकाशा आहे,  कि मानवी जीवनातील सर्व रहस्ये, व सम्भाव्य घडामोडी ह्या, भाव,  ग्रह, राशीं, नक्षत्रांच्या माध्यमातून,  सांकेतिक भाषेत,  त्यात  लिहिलेल्या असतात. 


▪️ अट एकच,  कि आपली जन्म तारीख, जन्मवेळ, जन्मस्थळ ही माहिती,व त्या माहितीच्या आधारावर  बनविलेली,  आपली कुंडलीही बिनचूक असावी. 


 ▪️माझे भावी जीवन कसे असेल ? मी कोण होईल ?, मला नावलौकिक मिळेल कां ? अशा अनेक प्रश्नांची मालिका,  मनाच्या पडद्यावर, सुरु होते.

 

  ▪️ आर्थिक स्थिती कशी राहील ?,  असे वाटणे,  स्वभाव सुलभच म्हणता येईल. 


 ▪️ मनुष्याच्या जीवनात, पैसा म्हणजे सर्व काही, असे नसले तरी,  पैशाला खूप महत्व आहे, हे ना कबूल करून चालणार नाही. 


◾️कुंडलीच्या माध्यमातून,  आर्थिक प्राप्ती दर्श वणारे भाव,  प्रामुख्याने,  द्वितीय भाव, पंचम भाव, अष्टम भाव, लाभ भाव  म्हणता येतील. 

 ◾️द्वितीय भाव,  हा वडिलोपार्जित संपत्ती दर्शक, पंचम भाव हा सट्टा, लॉटरीचा धन दर्शक,  अष्टम भाव हा  वारसा हक्काने, अकस्मात धनलाभाच्या स्रोत, तर लाभ भाव हा, स्वकष्टार्जित धनाचा भाव म्हणता येईल. 


◾️वरील सर्व भावांचा, भावात विद्यमान असलेले ग्रह, व त्या भावस्वामींची राशीगत शुभाशुभ स्थिती, याचा तारतम्याने विचार केल्यास,  आयुष्यातील आर्थिक आवकेची, यथार्थ  कल्पना येते. 


🔹वरील सर्व धनदायी स्थानात, अष्टम स्थानाचा आपला एक स्वतंत्र ठसा आहे. 

कारण या स्थानासंबंधाने होणारी धनप्राप्ती ही विना परिश्रमाची, विना कष्टाची असते. 

गुप्त धनहि याच सदरात मोडते. प्रथम दर्शनी, हे वैशिट्य जरी मनाला भुरळ पडणारे असले,  तरी जेव्हा चिंतनाअंती  त्याचा गूढ अर्थ कळतो तेव्हा,  त्याचे गांभीर्य लक्षांत येते. 


 🎯 हा मुद्दा,अधिक स्पष्ट करून सांगतो.


◾️जमिनीत गाडलेले धन मिळणे, कुण्या  निपुत्रिकाची संपत्ती मिळणे, आई वडिलां कडून वारसाने संपत्ती मिळणे, जोडीदारा चे पश्च्यात,  उर्वरित धनाचा वारसा मिळणे, लाच - लुचपतीतून पैसा मिळणे, वा कोणाची अडवणूक करून, डोनेशन द्वारा,  वसुली करणे, ब्लॅक मेलींग द्वारा, खंडणीद्वारा, पैसा उकळणे,अकस्मात धन सापडणे, या सर्व बाबी,  अष्टम स्थानाशी संबंधित आहेत. 


◾️अष्टमेश अष्टमात,  राशींदृष्ट्या बलवान असला, अष्टमेशाची अष्टम स्थाना वर दृष्टी असली,  कि अशा धनप्राप्तीचे योग येतात. वा अष्ट्मात असणारे ग्रह, ज्या भावाचे स्वामी असतात, तो भाव ज्या नातेवाईकांशी संबंधीत असतो, त्या नात लगांकडून, धनप्राप्ती होण्याची शक्यता असते. 


 ☺️ गाडलेले, वा गुप्त धनासंबंधी  बऱ्याच आख्ययिका आहेत. त्यात मनो रंजनाचा भाग अधिक व तथ्यांश कमी आहे. आमच्या बालपणी, आजी आजोबां कडून अशा  खूप, उत्कंठा वर्धक  कथा,  ऐकवल्या जात. त्याचा सारांश  :-


      👉 " तो त्या जुन्या, भयाण निर्मनुष्य वाड्यात,  खोदकाम करत असताना,  कुदळीचा  खन्नकन आवाज आला. पहातो तो काय ! एक धातूचा,  तोंड बंद असलेला हंडा !!. तो  "आ "वासून पहातच राहिला. तेवढ्यात, त्याच्या कानाजवळ,   एक अपरिचित  आवाज आला,  " मी येतो ! पण,  मला तुझ्याकडून काही (बळी) हवे आहे. तू देशील कां ? ".  हा म्हणाला, 

" माझ्याकडे पंचपक्वान्ने नाहीत. चटणी भाकरी आहे. तुला आवडत असेल, व सुखाने यायचे असेल,  तर ये.  नाही तर,  नको येऊस.!  " 

       तो हंडा बाहेर काढून, त्याने उघडून पहिले तर, आतमध्ये नुसते कोळसेच कोळसे /वा खच्चून भरलेल्या मोहोरांच -मोहरा. "


▪️ वरील कथेचा मतितार्थ असा कि, कोळसा म्हणजे,  धन नशीबात नव्हते वा ते मिळाले, तरी लाभी राहणार नाही. मोहरा मिळणे म्हणजे,  होणारी ती धनप्राप्ती,  सुखकारक, व उन्नतीस पोषक होणार. 


▪️आता ज्योतिष्य अभ्यास करतांना, असे वाचनात येते कि, शुभ ग्रहाद्वारा, अष्टमातून,  प्राप्त झालेले धन फलदायी, सुखकारक, उन्नतिकारक असते. याउलट, बलवान पापग्रहांनी मिळणारे धन, हे काहीतरी संकट, समस्या घेऊन येणारे, सहजासहजी न पचणारे असते. कधी कधी  " भीक नको ! पण,  कुत्रं आवर !! " अशी जातकाची  स्थिती होण्याची संभावना असते. 


 ▪️ वर लिहिलेल्या कथेतील मोहोरा व कोळसा यांचा संबंध, अनुक्रमे शुभ ग्रह व पापग्रह असा लावल्यास, त्या कथेचे प्रयोजन ध्यानी येईल.


◾️अर्थात, जुन्या काळी,  सुगीचे दिवस असताना, उत्पन्न चांगले असल्यास, व भोगवृत्तीचा अभाव असल्यास, शिल्लक मिळकत, सोने -चांदीच्या, नाण्याच्या स्वरूपात,  जमिनीत पुरून ठेवण्याची,  प्रथा होती. काळाच्या ओघात, तिची जरूर पडत नसे वा आकस्मिक निधन झाल्यास, वारसास,  त्याची कल्पना दिलेली नसे. असे धन, पुढे कालांतराने, ज्याच्या नशिबात असेल, त्याला मिळत असे. पण हे धन,  ज्योतिष्यशास्त्र दृष्ट्या,  दूषित समजले जाते.  कारण  धन पुरून ठेवणाऱ्यानी,  ते इतरांसाठी ठेवलेले नसून, स्वतः साठी ठेवलेले असल्यामुळे, त्याची सुप्त इच्छा, त्यात गुंतलेली असते. 

त्यामुळे ते "शापित " धन आहे,  असेही म्हणता येईल. अशी तामसी वासना,  त्यात दडलेली असेल,  तर ते कितपत लाभी राहील ?, हा विचार,  मति कुंठित करणारा आहे.  

▪️आतापावेतो उत्तखननहि बऱ्याच प्रमाणात झालेले आहे, भोगवादी प्रवृत्ती वाढून,  आर्थिक चिंता निर्माण होत आहेत. बँकिंग सुविधा असल्याने,  धन पुरून ठेवणे,  हे कालबाह्य झालेले आहे. गुप्तधन प्राप्ती, कल्पना मात्र उरली  आहे. 


◾️निपुत्रिकाची संपत्तीही दूषित संपत्ती समजली जाते. आयुष्यभर कवडी कवडी गोळा करून, अंतसमयी ती तशीच, उपभोगा वीना, सोडावी लागते,  हि असूया त्यात दडलेली असतेच. त्यातल्या त्यात,  संपत्ती घेणाऱ्याने,  जर निपुत्रिका च्या अंतकाळी,  त्याची काळजी घेतली नसेल, त्याच्या अपेक्षा भंग केल्या असतील,  तर मग ती संपत्ती,  " शापित " च  म्हणायला हवी. कारण धन दात्याचा तळतळाट,  त्या मागे असतो.  


◾️आई, वडील  वा जोडीदार गेल्यानंतर,  वारसा हक्काने संपत्ती मिळणार. यात  मातृ पितृ छत्र हरविल्याची,  दुःखद भावना आहेच. अनुकंपा तत्वावर,  जर काही लाभ होत असतील, तरी त्याचा सोर्स,  हा दुःखदच समजला जातो. वार्धक्यात हे दुःख,  तेवढे जाणवणार नाही. पण, अकाली घडणाऱ्या दुर्घटना, मनावर खोल जखम करणाऱ्या ठरतात. 


◾️लाच खाणारा जरी आनंदी होत असला, तरी देणारा हा राजीखुशीने कधीच पैसा देत नसतो. जेव्हा त्याची निकड पाहून पद्धतशीर त्याची अडवणूक केली जाते व त्यांची ऐपत नसताना त्यांना भुर्दंड बसतो ते मनातून शिव्या शाप देतातच. 

अर्थात, लाचखोराच्या घरात मुबलक पैसा आल्या नंतर सगळा "आनंदी आनंद " च असतो. सुरा - सुंदरी घरात ठाण मांडून बसतात. आयुर्मर्यादा कमी होते. अलक्ष्मी मुळे मुलांचे संस्कार बिघडतात. " जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान " याची " याची देही,  याची डोळा " प्रचिती येते. 

यासाठी प्रत्येक गृहलक्ष्मीने घरात किती पैसा येतो या पेक्षा तो कुठून येतो हे पाहणे व त्यास आवर घालणे अगत्याचे ठरते. 


◾️अडवणूक करून मागितलेले डोनेशन,  देणग्या, यांची नांवे जरी गोंडस असली तरी त्यात देणाऱ्याच्या इच्छेचा सहभाग नसल्याने एकूण एकच आहे. 


◾️थोडक्यात अष्टमस्थानातून मिळणाऱ्या संपत्तीच्या मागे,  वर सांगितलेले " पण, परंतु " दडलेले आहेत. म्हणून हे धन दूषित समजण्यात येते. 


◾️वरील विषयावर लिहिलेले,  माझे हे व्यक्तिगत,  विचार मंथन आहे. प्रत्येकास  ते रूचेलच,  असे नाही. व तसा माझा,  आग्रहही नाही. पण बरेच वाचक,  याचा बारकाईने विचार करतील, त्यांच्या विचारांना चालना मिळेल,  असा विश्वास आहे.  


  

Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली