थोडेसे शुक्राविषयी :-

 

थोडेसे शुक्राविषयी :-

💢 शुक्र हा शुभ स्त्री ग्रह असून सौदर्य, कला, संगीत, मनोरंजन, रसग्रहणक्षमता याचा कारक असणारा, रजोगुणी ग्रह आहे.  शुक्रास भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले आहे.

💢 शुक्राच्या अखत्यारीत कोणते व्यवसाय वा क्षेत्रे येतात ? हे एका वाक्यात सांगावयाचे झाल्यास, " मनुष्य जीवन यापन करण्यासाठी, आवश्यक असणाऱ्या, सर्व वस्तू खरेदी करून झाल्यावर, पैसे उरल्यास, ज्यासाठी आनंदाने खर्च करतो, त्यास सर्व वस्तू वा क्षेत्रे, शुक्राच्या अधिपत्यात येतात. "
कारण पैसा कमावतो तो कशासाठी ? तर सुखोपभोग घेण्यासाठी. व्ययस्थान हे उपभोगाचे स्थान. म्हणून फक्त शुक्रालाच  बारावे स्थान मानवते, असे म्हटले जाते. त्यामुळे सर्व शौकाच्या वस्तू शुक्राच्या अधिपत्यात येतात. यातहि स्त्रियांना लागणाऱ्या, सर्व वस्तूचा भरणा अधिक असतो. उदा. कापड, बांगड्या, गजरे, फुले, अत्तरे, रत्ने, अलंकार, कोस्मेटिक्स, फर्निचर, वाहन, सहलीसाठी प्रवास,  गायन, वादन, नृत्य, अभिनय, सिनेमा जगतातील व्यवसाय, शृंगारिक साहित्य निर्मिती, टी. व्ही विक्रीचे शो रूम, आईस्क्रीम, कोल्डड्रिंक्स , खाद्य पदार्थ विक्री व्यवसाय, रेस्टोरंट, मिठाईचा व्यवसाय, सजावटी सामान विक्री व्यवसाय, ब्युटी पार्लर, इत्यादी.

💢 थोडक्यात, कुंडलीत शुक्र बलवान असल्यास, वरील विषयात त्या व्यक्तीस अधिक रुचि असते. त्यांच्या प्रत्येक कामात टापटीप, आखीव रेखीवता असून, कलात्मकता आढळते. त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व प्रभावी, आकर्षक व कला गुण संपन्न असते.

💢 लग्न केंद्रात शुक्र असून तो वृषभ, तूला, वा मीन राशींचा असेल, तो एकटा असून कुठल्याहि पापग्रहाच्या दृष्टीत नसेल, पाप कर्तरीत नसेल, लग्नेशाचामित्र असून अशांत्मक बलवान असेल, नवांश कुंडलीतहि बलवान असेल तर " मालव्य " योग तयार होऊन कला क्षेत्रात नाव लौकिक मिळविणारी , व सर्व भौतिक सुखे मिळणारी व्यक्ती असते.

💢 वृषभ ही पृथ्वी तत्वाची व तुला ही वायू तत्वाची,अशा या शुक्राच्या दोन राशीं असल्या तरी, वृषभेपेक्षा तुळेत शुक्र अधिक खुलतो. त्याला कारणहि तसेच आहे. तुला ही वायू राशीं आहे. वायुराशी कल्पक राशीं असतात. त्यामुळे कला व शृंगार याचा कारक असलेल्या शुक्रास, कल्पना विलासाला अधिक वाव मिळाल्यामुळे, तो तुळेत अधिक प्रभावी फळे देतो. तसेहि, तुला ही शुक्राची मूळ त्रिकोणराशी मानली जाते. कन्या ही शुक्राची नीच, व मीन ही शुक्राची उच्च राशीं आहे. अर्थातच, नीच राशीत असलेल्या ग्रहाकडून, जर त्याचा नीचभंग झाला नसेल तर, शुभ फळाची अपेक्षा करता येत नाही. मीन वस्तुतः गुरुची राशीं व गुरु -शुक्र हे मित्र नाहीत तरी पण, या राशीत शुक्र उच्चीचा होतो. अशा उच्च शुक्राचा ओढा, आर्थिक संपन्नतेकडे अधिक असतो.

💢 शुक्र व चंद्र हे दोन्ही नैसर्गिक शुभ ग्रह असून स्त्री ग्रह आहेत पण, चंद्र हा मानसिक सुखाचा, तर शुक्र हा इंद्रिय जन्य सुखाचा कारक आहे. हा दोघांच्या  कारकत्वातील फरक, लक्षात घेणे जरुरी आहे.

💢 शुक्र व बुध हे दोन ग्रह असे आहेत कि, ते सूर्याच्या जवळ असल्याने बरेचदा अस्तंगत अवस्थेत असतात. फलादेश करताना, हेहि पाहणे अगत्याचे असते. कारण अस्तंगत ग्रह बलहीन होतात. मग ते कुठल्याहि राशीत असोत.

💢 शरीर आरोग्याच्या दृष्टीने शुक्राचा विचार केल्यास, शुक वीर्य, मूत्र, रजो स्त्रावाचा, कारक ग्रह मानतात.

▪️शुक्र तारा अतिशय तेजस्वी असल्याने त्यास रवि -चंद्राबरोबर डोळ्याचाहि कारक मानले आहे.

▪️शुक्र गोड पदार्थाचा हि कारक मानतात. त्यामुळे शुक्र बिघडल्यास वा त्याचा षष्ठ -व्यय स्थानाशी संबंध आल्यास, तो क्रूर नक्षत्री असल्यास डोळ्याचे आजार, मधुमेह, मूत्रमार्गाचे आजार, वीर्यदोष, स्त्रियांना मासिक पाळी बद्दल तक्रारी अशा विविध समस्या उद्भवतात.

▪️वृषभेत शुक्र स्वराशीचा असला तरी, वृषभेचे सुरुवातीचे 3 चरण हे कृतिका या क्रूर नक्षत्राचे आहेत. हे आरोग्याच्या दृष्टीने विचारात घ्यावे लागते.

▪️कुठलाहि ग्रह स्वराशीत असला तरी तो जर क्रूर नक्षत्रात असेल तर शरीरास पीडाकारक ठरतो.

💢 सप्तम स्थानाचा आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा शुक्राचा विचार करणे क्रमप्राप्त असते. कारण ग्रहामध्ये वैवाहिक सुखाचा प्रभार, हा शुक्राकडे दिलेला आहे.

💢 विवाह सुख हे सप्तमस्थान, सप्तमेशाची स्थिती तसेच विवाहसुखाचा कारक म्हणून शुक्राची कुंडलीतील स्थिती, यावरून पाहिले जाते. या तिन्हीची स्थिती, कुंडलीत शुभकारक असेल तर वैवाहिक सुख उत्तम मिळते.
याउलट स्थिती असता, वैवाहिक सुख बिघडून, विवाह न होणे, नपुसंकत्व असणे, विवाह झाल्यास उशिरा होणे, पती -पत्नीचे आपसात न पटणे,वैधव्य - विधुरता येणे, घटस्फोट, परित्यक्ता होणे, विरह होणे अशा विविध प्रकारांनी वैवाहिक सुख बाधित होते.

💢 स्थानानुरूप शुक्राचा विचार केल्यास सर्व साधारण फळे अशी सांगता येतील.

▪️प्रथम स्थानात शुक्र शुभ स्थितीत असता, आकर्षक व्यक्तिमत्व प्राप्त होते. विशेषतः डोळे सुंदर असतात. राहणी मान टापटीपीचे असते. उंची वस्त्रे अत्तरे याची आवड असते. कलाकारीची आवड असते.

▪️द्वितीयात शुक्र शुभ स्थितीत असता वाणी गोड व नादमधुर असते. यास मंगळाची जोड लाभल्यास, हे उत्तम गायक होतात.  टेलिफोन ऑपरेटर, वृत्त निवेदक या व्यवसायास हा शुक्र पोषक असतो. खानपानात हे चोखंदळ असून गोड पदार्थाची आवड असते. चांदीची भांडी, या व्यक्तीच्या संग्रहात अधिक असू शकतात.

▪️तृतीय स्थानी शुक्र असता, अक्षर सुंदर असते. पाठीवर बहुधा बहीण असते. ललित साहित्य, छोटे लेख, कविता लिहिण्यात रुचि असते. यांना ते कुठेहि राहोत, शेजारसुख उत्तम मिळते. छोटे प्रवास भरपूर होतात. दशमाशी शुक्राचा संबंध असता, नोकरीं प्रवासी स्वरूपाची असू शकते.

▪️ चतुर्थात शुक्र शुभ स्थितीत असेल तर तो चतुर्थाचा कारक असल्याने मातृसुख, वाहनसूख, पशुपालन सुख स्थावर मालमत्तेचे सुख उत्तम मिळते. घर सर्व सुखसोयीच्या साधनांनी युक्त असते. प्रारंभिक शिक्षण उत्तम होते. हा शुक्र वायुराशीत असता, उंचावर घरे देतो. अपार्टमेंट मध्ये वरच्या मजल्यावर घराची शक्यता असते. जलराशीत असता, ओलीताची शेती होऊ शकते.

▪️ पंचमस्थानात स्थानात शुक्र असता, व्यक्तीचा कलेकडे ओढा असतो, प्रेमप्रकरणात व्यक्ती पुढाकार घेणारी असते. यांना प्रथम संतान बहुधा कन्या होते. हा शुक्र अभिनय कला, डिझाईनर, साहित्य, नाट्य या क्षेत्रात शिक्षणासाठी प्रवृत्त करणारा असतो. विषयासक्तता थोडी अधिक असते.

▪️ षष्ठ स्थानातील शुक व्यक्तीस अधिक विषयलोलूप करतो. व्यक्ती आळशी व आरामप्रिय वृत्तीची असते. नोकरीत असता, कामापुरते काम करून नोकरीचे इतर फायदे कसे लाटता येतील? याचा विचार हे लोक अधिक करतात. कर्ज काढून मौज करण्याची प्रवृत्ती असते. हा जलराशीत असेल तर मद्यपानाची सवय लागू शकते.आहार भरपूर व विषयातिरेक असल्याने, तत्सम लैंगिक आजाराचा, मधुमेहाचा संभव असतो.

▪️ सप्तमात शुक अशुभ स्थितीत  नसेल तर लग्न लवकर होते. पत्नी दिसावयास सुंदर असते. सप्तमाचा कारक शुक्र सप्तमातच असल्याने, विषयवासना अधिक असते. हा शुक्र अशुभ ग्रहाचे सानिध्यात वा दृष्टीत असता. वैवाहिक सुखात अडथळे निर्माण होतात.

▪️अष्टमात शुक्र असता, शुक्र हा नैसर्गिक शुभ ग्रह असल्याने धन दाता होतो. सट्टा, लॉटरी, वारसाहक्काने धनलाभ, रिश्वतखोरी, गाडलेले धन वा अवैध मार्गाने पैसा मिळतो. हा शुक्र वैवाहिक सुखास चांगला नाही. व्यसनात खर्च होऊ शकतो. आरोग्यविषयक अडचणी निर्माण होतात.

▪️नवमात शुभ स्थितीत शुक्र असता, भरपूर प्रवास होतात. स्त्री दैवताची पूजा अर्चना करणे यांना मनापासून आवडते. या स्थानी शुक्र असता, प्रेम प्रकरणा साठी यांना कुणीतरी प्रपोज करण्याची शक्यता असते. यांच्या भाग्योदयास एखादी जेष्ठ, आदरणीय स्त्रीचे मार्गदर्शन प्रभावी ठरू शकते. हा शुक्र कीर्ती, प्रतिष्ठा अशी सर्व सुखे प्रदान करणारा ठरतो.

▪️ दशमातील शुक्र शुभ स्थितीत असता, कामाचा  ताण नसलेल्या नोकऱ्या मिळतात. बरेचदा हुद्दा कमी असूनहि अधिक मान मिळतो. व्यक्ती व्यवसाय करीत असता, वर वर्णन केलेले शुक्राच्या अधिपत्यातील उद्योगात यांची भरभराट होते.

▪️ शुक्र लाभात असता, नैसर्गिक शुभ ग्रह असल्याने लाभकारी ठरतो. मित्र परिवार मोठा व सौदर्य दृष्टी असलेला असतो. यात स्त्रियांचा भरणा अधिक असू शकतो. जेष्ठ बंधुकडून सहकार्य लाभते. सुना, जावई उत्तम मिळतात. आर्थिक भरभराट होते.

▪️व्ययस्थानात फक्त शुक्रासच उत्तम मानले जाते. कारण व्ययस्थान हे खर्चाचे व शुक्र भोगाचा कारक ग्रह आहे. त्यामुळे सर्व प्रकारची ऐहिक सुखे हा शुक्र मिळवून देतो. हे शैय्या सुखाचे स्थान असल्याने शुक्रास मानवते. परदेश प्रवासासाठी हा शुक अनुकूल असतो. जलराशीतील समुद्री प्रवास तर वायुराशितील विमान प्रवासासाठी अनुकूल असतो.

💢 आता शुक्रसोबत जर कोणता ग्रह युति वा सम सप्तक योगात असेल तर सर्व साधारण काय फळे मिळतील ? याचा अंदाज घेऊ.

🔼 शुक्र रवि - युति होऊ शकेल पण समसप्तक योग होत नाही. शुक्र अस्तगत आहे कां हे पहावे. शुक्र रवि यात 1अंशाचे अंतर असेल तर, वीर्य कार्यक्षम नसते. यात शुक्र स्वाभिमानी होतो. चारित्र्य निष्कलंक असावे हा दृष्टिकोन असतो.

🔼 शुक्र -चंद्र - कलात्मक ओढा असतो. चेहेऱ्यावर तीळ वा काही खुणा असतात. त्वचा मुरूमाड असू शकते. स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास असतो. हा विरह योगहि आहे.

🔼 शुक्र -मंगल - प्रेमप्रकरणाची संभावना, राहणी अतिशय टापटीपीची, कला साहित्यात रस, स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास असतो . ही युति ज्या स्थानात आहे, त्या स्थानाने दर्शवलेल्या नातेवाईकांचाहि प्रेमविवाह असू शकतो. ज्यांच्या कुंडलीत हा योग आहे, त्यांच्या कुटुंबात, त्यांचाच अधिकार चालतो.

🔼 शुक्र -बुध -फक्त युति होईल. सम सप्तक योग होत नाही. यात वाणीत बुद्धीची चमक सापडते. विषय प्रतिपादन क्षमता चांगली असते. दर्जेदार साहित्य निर्मितीस हा योग पोषक आहे.

🔼 शुक्र -गुरु - यात योग व भोग याचे संतुलन सापडते. पत्नी विदुषी, उच्चविद्या विभुषित मिळण्याची संभावना असते.

🔼 शुक्र - शनी - हे दोघेहि मित्रग्रह आहेत तरी, यात शनी महाराजांचे कारकत्व वरचढ ठरते. विवाहास उशीर, वैवाहिक सुखात समाधान नसते ते मानावे लागते. राहणीमान गबाळे असु शकते. पती पत्नी प्रेमात कर्तव्य परायणतेचाच पगडा अधिक असतो.

🔼 शुक्र -राहू - काही केसेस मध्ये विषय वासना अधिक तर काही केसेस मध्ये खूप कमी सापडते. हा योग वीर्य दोषहि निर्माण करू शकतो. या योगामुळे पती पत्नीत धर्मभेद,  जातीभेद, शाखाभेद असू शकतात. या दृष्टीने हा योग प्रेम प्रकरणास उपयुक्त मानता येईल. क्वचित प्रसंगी, ज्याचे अगोदर कुठे जुळले होते व ते तुटले असाहि जोडीदार मिळू शकतो.

🔼 शुक्र -प्रजापती - हर्षल हा विक्षिप्त स्वभावाचा व आकस्मिक परिणाम देणारा पापग्रह असल्याने शुक्र बिघडतो. ध्यानी मनी नसता, विवाहात अडथळे येतात. विवाहाची तारीख बदलली जाते. विवाह वा प्रेमप्रकरण होईल पण टिकेलच याची खात्री नसते. पती पत्नीत नंतर मत -मतांतरे होऊ शकतात. इतर ग्रहस्थिती नकारात्मक असल्यास घटस्फोटापर्यंत मजल जाते.

🔼 शुक्र -नेपच्युन - नेपच्यून हा अतींद्रिय  शक्ती असलेला अतिसंवेदनशील, भ्रम व मानसिक गोंधळात भर टाकणारा ग्रह आहे. त्यामुळे हा शुक्रास पहात असल्यास वा युतीत असल्यास, जोडीदाराबद्दलच्या अपेक्षेत फसवणूक होण्याची संभावना अधिक असते.
उदा. जोडीदारास फेफरे येणे, तो व्यसनाधीन असणे, लक्षात न येणारे काही व्यंग असणे, अशी फसवणूक होऊ शकते. तसेच स्वभावहि एकमेकास पोषक असतील असे नाही.

⚛️ कुठलाहि पापग्रह शुक्राच्या अंशात्मक युतीत, वा दृष्टीत असेल तर, त्याचे परिणाम, शुक्रावर शतप्रतिशत होतात. मग तो योग 2 अंशावर असो कि 28 अंशावर.

💢 थोडक्यात, कुंडलीतील सप्तम स्थान, सप्तमेश व शुक्र याची राशीं - स्थान निहाय स्थिती, यावर वैवाहिक जीवनाचे भवितव्य अवलंबुन असते.

वरील लेख भविष्य दर्पण मासिक मे 2021 च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.



Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली