परदेश गमन व भाग्यस्थान.
परदेश गमन व भाग्यस्थान.
मूलतः कुंडलीचा अभ्यास सुरु होतो तो प्रथम स्थान -लग्नस्थान व लग्नेश या पासून. कारण प्रथम स्थानावरून जातकाची इच्छाशक्ती, कार्यप्रवणता, व कुंडलीतील इतर स्थानांची फळे ग्रहण करण्याची क्षमता अभ्यासता येते.
लग्न बलवान असता कुंडलीचा दर्जा उंचावतो.
कुंडलीतील नवम स्थान हे अत्यन्त शुभ स्थान असून हे या जन्मापुरते तरी, आपले संचित, प्रारब्ध याचा कल दर्शवणारे स्थान आहे , या स्थानाच्या आधारे, जातक आपल्या जीवनात कोणत्या क्षेत्रात, कितपत सफल होईल याचा अंदाज करता येतो.
भाग्येश मूलतः शुभ ग्रह असून तो कुंडलीत शुभ स्थानी, राशीं, अंशादि बलवान, अशुभ ग्रह दृष्टी विरहित,नवांशबली असता, अतिशय उत्तम असते.
तसेच भाग्यस्थानी असणारे ग्रह कोणत्या भावाचे स्वामी आहेत.? ते कारक आहेत कि अकारक,? राशीं अंश दृष्टया ते कशा स्थितीत आहेत ? हे पाहणेहि अगत्याचे असते.
या स्थानाचे कारक ग्रह, निसर्ग कुंडलीत, पंचम स्थानाचे अधिपत्य असणारा, आत्मा कारक, जीवनशक्ती, मानसन्मानाचे प्रतिक असणारा रवि, व नवम स्थानाचे अधिपत्य असणारे , ज्ञान, परोपकार, जनकल्याणाची भावना असणारे , अध्यात्म, विवेक व सत्व गुणाचे कारक असणारे, गुरु महाराज आहेत.
हे कारक ग्रह, बलवान असून, ते नवमस्थांनाशी शुभ संबंधित असता, जातकाच्या प्रयत्नास, नशिबाचे पाठबळ मिळते. विशेष संघर्ष न करता, मनातील अनेकविध इच्छा आकांक्षा, लिलया पूर्ण होतात.
थोडक्यात, भाग्येश, भाग्यस्थानातील ग्रह, व भाग्याचे कारक ग्रह याच्या कुंडलीतील स्थितीवरून, भाग्याची साथ कितपत लाभेल ? हे ठरत असते.
असे हे एक, आगळे वेगळे महत्व असलेले, भाग्यस्थान आहे.
भाग्य स्थानावरून, पित्याचे सुख, गुरुकृपा, धर्माविषयीची श्रद्धा, यज्ञ यागादि जप, तप, अनुष्ठाने, मानसन्मान, प्रसिद्धी, लौकिक व उच्च विद्या याचा बोध होतो.
नवम स्थान हे शरीरातील मांड्या या अवयवाचे प्रतिनिधित्व करते.
नाते संबंधाबाबत, नवमस्थांनावरून, नातवंडे, जोडीदाराचे धाकटे भाऊ -बहिणी, धाकट्या भावंडांचे जोडीदार यांचा विचार केला जातो.
भाग्यस्थान हे पत्रिकेतील तृतीय, सप्तम, नवम, व्यय या चार प्रवासासंबंधित स्थानांपैकी एक महत्वाचे स्थान आहे.
💢 तृतीय स्थान हे देशांतर्गत छोट्या छोट्या प्रवासाचे स्थान आहे. पण ते नवमाचे सप्तम असल्याने, महत्वाचे आहेच.
💢 सप्तम स्थान हे मध्यम प्रवासाचे स्थान आहे. ते जोडीदाराचे स्थान असल्याने, अर्थातच विवाहानंतर या स्थानातील ग्रहांमुळे प्रवासाचा योग येतो.
जोडीदाराच्या पत्रिकेत जर परदेश प्रवासाचे योग असले तर दुधात साखरच.
" जोडीदाराचा पायगुण लाभी लागला " असे म्हणता येते. सप्तमेश जर व्यय स्थानात असेल, व व्ययेश सप्तमात असेल तर, वैवाहिक सुखासाठी जरी अशुभ समजले जात असले तरी, परदेशी जाण्याचे योग मात्र येऊ शकतात.
अर्थात इतर ग्रहांचे पण सहकार्य हवेच.
💢 नवम स्थान हे विशेषतः शुभ प्रभाव देणारे, लांबच्या यात्रा दर्शवणारे स्थान आहे. बऱ्याचशा यात्रा , धार्मिक उद्देशाने होऊ शकतात.
या ठिकाणी लग्न, पंचम नवम स्थानात गुरु असता, संपूर्ण धर्म त्रिकोण बलवान होत असल्याने, अशा जातकाच्या " चार धाम यात्रा " सहजा सहजी होतात. फक्त गुरु महाराज शुद्ध असले पाहिजेत. भाग्यस्थानात 1,5,9 या अग्निराशी असता, आगगाडी द्वारे रेल्वे प्रवासाची शक्यता असते.
तसेच मान मरातब, लौकिक, प्रसिद्धी या दृष्टीने परदेश प्रवासासाठी भाग्य स्थान उत्तम मानतात .
💢 व्ययस्थान हे फार लांबच्या प्रवासाचे स्थान मानले जाते. जलप्रवास, हवाई प्रवास यासाठी या स्थानाचा विचार करावा. हवाई प्रवास सर्व प्रवास प्रकारात अधिक खर्च करवून घेणारा प्रवास आहे म्हणून तो व्ययस्थानापासून पहात असावेत.
व्ययस्थान हे खर्च, सजा, दंड, बदनामी, दुरलौकिक देणारे स्थान असल्याने, व या व्ययस्थानासमोर, नेमके षष्ट स्थान हे अशुभ स्थान येत असल्याने, या स्थानाचा परदेश प्रवासाबाबत, फार बारकाईने विचार करावा लागतो.
परदेश प्रवास हा शुभ आहे कि अशुभ ? हे त्याच्या कारणावरून ठरते.
देश सोडण्याची शिक्षा, तडीपार -हद्दपारी, विशेष किचकट असणाऱ्या अशा शस्त्रक्रिया कि, ज्या स्वदेशी करणे शक्य नसते, किंवा काही भ्रष्टाचार करून परदेशात पळून जाणे, परक्या देशाची तुरुंगवारी होणे, असले अशुभ योगहि परदेश गमनात मोडतात.
म्हणून व्ययस्थानाशी संबंधित, परदेश गमनाचा विचार धनात्मक कि ऋणात्मक ?, असा दोन्ही बाजूनी करणे आवश्यक असते.
परदेश गमनासंबंधी, वरीलप्रमाणे व्यय व नवम या दोन्ही स्थानाचा विचार केला असता, कारकत्वानुसार व्ययापेक्षा नवम स्थानच दर्जेदार वाटते.
पंचमेश जर व्ययस्थानी असेल, तर तो स्वस्थानापासून अष्टमात येतो. त्यामुळे माध्यमिक-पदवी शिक्षणास वेळ लागेल, शिक्षणात वेळ खर्च होईल, वा गती कुंठित होईल, असे प्रथम दर्शनी जरी वाटत असले तरी, या योगामुळे परदेशात वा परक्या भागात, शिक्षणासाठी निवड होऊ शकते, ही शक्यता नाकारता येत नाही. घरच्या भाकरीवर शिक्षण होणे, व परक्या ठिकाणी शिक्षणास जाणे, यात आर्थिक दृष्ट्या, निश्चितच फरक आहे.
दुसरीकडे निश्चितच अधिक खर्च होणार. हे व्यय स्थानाचे वैशिष्ट्य आहे .
या संदर्भात, परदेश गमन म्हणजे नेमके काय ? हेहि समजून घेणे महत्वाचे आहे.
ज्या भागात गेल्यानंतर, तिथल्या स्थानिक लोकांची भाषा वेगळी असते, वेशभूषा वेगळी असते, आहार, धर्म वेगळा असतो, आपण फार लांब व परक्या भागात आलो ही जाणीव आपल्याला सातत्याने असते. तो परदेश होय.
या अर्थाने एखादा उत्तर प्रदेशी, तामिळनाडूत गेला, तरी हा योग पूर्ण झाला असे म्हणता येईल.
जेव्हा समुद्र ओलांडल्या जातो. तेव्हाहि परदेश गमन होते. आपण अंदमानात जरी गेलो, तरी समुद्र ओलांडल्याने, खानपान वैविध्य असल्याने, परदेश गमन झाले असे म्हणता येईल.
नंतर कोणत्याहि योगामुळे, स्वदेशा बाहेर जाणे हा परदेश गमनाचा, प्रचलित अर्थ आहे.
वर सांगितलेल्या तृतीय, सप्तम, नवम, व्यय स्थानाचे भावेश जर एकमेकांशी अन्योन्ययोग, दृष्टियोग, युतीयोग करत असतील व ते व्यय व नवमात असतील तर परदेशगमनाचा योग नक्की येतो.
हा योग केव्हा येईल ? यासाठी गोचर -दशादि विचार करावा.
परदेश गमनाच्या पत्रिकामध्ये, राहू या ग्रहांचा फार महत्वाचा रोल दिसून येतो.
हा राहू जर या प्रवास स्थानात असेल तर परदेश गमनास साह्यकारी ठरतो. नवमातील व व्ययातील राहू, परदेश गमनासाठी अत्यंत उपयुक्त असतो.
घरी असणे व घराबाहेर असणे या तशा वेगवेगळ्या बाबी आहेत. चतुर्थ स्थान चतुर्थेश बलवान असता, जन्मस्थानातच, जन्मगावी उदय होतो. बाहेर जावे लागत नाही.
याउलट चतुर्थस्थान, चतुर्थेश बलहीन असेल तर नोकरीं -उद्योगा निमित्त जन्मगाव -जन्मभूमी सोडावी लागते.
त्यानंतरच जातकाची प्रगती होते. म्हणून चतुर्थ स्थान कसे आहे ? हे परदेश गमनाचा विचार करताना पाहणे आवश्यक आहे.
चतुर्थेश व्ययात असेल, चतुर्थात राहू असेल, तर आयुष्याचा बराच कालखंड मातृभूमीपासून लांब राहण्यात जातो.
बऱ्याचशा पत्रिकातून हर्षलहि नवम- व्ययात असता, परदेश गमन योग पूर्ण झाल्याचे दिसून येते.
स्थूलमानाने, वर सांगितल्यानुसार तृतीय, सप्तम, नवम, व्यय स्थानाचे स्वामी परस्परांशी योग करत असतील.
व या ग्रहयोगात 4,8,12 या जल राशीचे तसेच चंद्र शुक्र नेपच्यून या जलग्रहाचे अधिक्य असेल, तर समुद्री प्रवास खूप होतील.
तसेच,3,7,11, या वायू तत्विय राशीत गुरु, शनी, बुध, या आकाश व वायुतत्त्वीय ग्रहांचा समावेश असेल तर हवाई यात्रा भरपूर होतील.
फार लांबचा परदेश प्रवास विचार, व्ययस्थांनापासून करीत असल्याने, व्यय स्थानात जो ग्रह असतो, त्याच्या कारकत्वानुसार, साधारणपणे, कोणत्या देशात गमनयोग घडेल याचा अंदाज आपण लावू शकतो.
स्थूलमानाने असे म्हणता येईल कि,
▪️रवि असता, विश्वात ज्यांना विशेष मान प्राप्त आहे, असे शक्तिशाली गौरवर्णीय प्रजा असलेले, संपन्न देश.
▪️ चंद्र बलवान असता, क्षेत्रफळाने छोटे, समुद्र किनारा असलेले देश.
▪️ मंगळ असता एकाधिकार शाही, तानाशाही असलेले, लष्कर हीच शक्ती असणारे देश.
▪️बुध/शनी बलवान असता कृष्णवर्णीय प्रजाधिक्य असलेले देश,
▪️ शनी असता, कृष्णवर्णीय व मागासलेले देश असू शकतात.
( पृथ्वी राशीत, जर व्ययस्थानात शनी +राहू असेल तर, नोकरीं व्यवसाया निमित्त जन्मभर पायपीट करावी लागते वा नोकरीत खूप भ्रमंती असते. )
▪️ गुरु असता प्राचीन संस्कृती असणारे, विश्वात उत्तम प्रतिमा असणारे देश असू शकतात.
▪️शुक्र असता, निसर्ग सौन्दर्यानी परिपूर्ण, सुखी संपन्न, उपभोगवादी देश.
▪️ राहुमुळे, सौदी अरेबिया, इस्लामिक देश असू शकतात.
▪️हर्षल असता, वैज्ञानिक दृष्टीतून अधिक प्रगत देश.
उदाहरणादाखल परदेश गमनासंबंधी
आपण 3 कुंडल्यांचा विचार करणार आहोत.
कुंडली क्र 1
▪️ या कुंडलीत लग्नेश लग्नातच असून, नवांशात तो उच्च राशीस असल्याने बलवान झाला आहे.
▪️ धनेश व पंचमेश असलेले गुरु महाराज भाग्येश चंद्रासह भाग्यस्थानी असून, त्यांची लग्नेश मंगळावर दृष्टी आहे.
▪️सप्तमेश व व्ययेश असलेला शुक्र, व्ययस्थानी हर्षलसह असून, तो तृतीयेश शनीच्या दृष्टीत आहे.
▪️भाग्येश भाग्यात गुरुसह, व व्ययेश व्ययात असल्याने, परदेश गमनाची दोन्ही स्थाने बलवान ठरतात. जातक अमेरिकेत नोकरीं करतो.
▪️लग्नस्थान बलवान असल्याने उत्तम प्रगती झाली.
कुंडली क्र.2
▪️या कुंडलीत चतुर्थात राहू असून चतुर्थेश मंगळ व्यय स्थानी नीच राशीत आहे. चतुर्थ स्थान बलहीन असणे, परदेश गमनास पोषक ठरते.
▪️व्ययेश चंद्र हा तृतीय या प्रवास स्थानात तूला या राशीस असून,तृतीयेश शुक्र भाग्यस्थानी मेष राशीस असून तो वर्गोत्तम आहे. चंद्र व शुक्र दृष्टियोग होतो.
▪️मंगळ जसा सुखेश आहे, तसा तो भाग्येशहि आहे.
▪️सप्तमेश शनी सप्तमात मुलत्रिकोण राशीत असल्याने बलवान झाला. शनी महाराजांची दृष्टी शुक्रावर आहे.
▪️भाग्येश मंगळाची दृष्टी शनिवर आहे.
▪️पंचमेश गुरु महाराजांनी धनात येऊन अर्थ त्रिकोण सांभाळला आहेच. धनेश /लाभेश असलेला बुध लाभातच आहे. लग्नेश रवि दशमात पंचमेश गुरुचे दृष्टीत, दशमेश वर्गोत्तम भाग्यात हे सर्व योग सांपत्तीक स्थिती उत्तम ठेवणारे आहेत.
▪️जातक आस्ट्रेलियात कार्यरत आहे.
▪️ या कुंडलीत चतुर्थात राहू व लेखात वर्णन केल्यानुसार, सर्व प्रवासी स्थाने आपापसात संबंध ठेऊन आहेत.
कुंडली क्र 3
▪️या कुंडलीतहि चतुर्थात बलवान राहू असून चतुर्थेश व्यय स्थानी आहे.
▪️व्ययेश /लाभेश शनी व सप्तमेश /चतुर्थेश बुध हे अन्योन्य योगात आहेत.
▪️भाग्यस्थानी हर्षल असून भाग्येश व धनेश असलेला मंगळ, व्ययेश शनीच्या युतीत सप्तमात आहे.
▪️भाग्येश मंगळाची दशम स्थानावर, कष्टेश रवि व पंचमेश असलेल्या चंद्रावर दृष्टी पडते.
▪️चतुर्थ स्थान बलहीन झाले असून, परदेश गमनाशी संबंधित ग्रह सप्तम स्थानात एकवटल्यामुळे, सप्तम स्थानास विशेष महत्व प्राप्त झाल्याने, विवाहा नंतर परदेश गमन झाले. विशेष म्हणजे जोडीदाराच्या कुंडलीतहि चतुर्थ स्थानी मेषेचा राहू आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांचे ग्रहमान एकमेकांशी शुभ वा अशुभ प्रभाव टाकत असतात. हेहि तितकेच खरे आहे.
काळ बदलतो तशा संकल्पना बदलतात. एके काळी कुणी परदेशी वास्तव्य करून परत आल्यास दोषपूर्ण समजले जात असे. त्याप्रित्यर्थ पूजापाठ करून शुद्धी केली जाई. आज " माझा मुलगा बाहेर परदेशात आहे." असे गौरवाने सांगितले जाते. परदेशगमन ही अभिमानाची बाब समजली जाते. इँटरनेटने तर सगळे जगच लहान करून ठेवले आहे.
" कालाय तस्मै नमः!"
तरी भाग्याशिवाय कुठलीही घटना आयुष्यात होत नाही. हे त्रिवार सत्य आहे. असा हा भाग्यस्थानाचा महिमा आहे.
= पुंडलिक दाते, अकोला
9421755299
Comments
Post a Comment