कलागुण व ग्रहयोग




💢 विचार मंथन : कलागुण व ग्रहयोग 💢

              " 14 विद्या व 64 कला " ही शब्दोक्ती

बरेचदा आपण ऐकलेली आहे . विद्येच्या तुलनेत, कलांची संख्या अधिक आहे, हेहि यावरून लक्षात येते. मानवाची दिवसेंदिवस, होत असलेली प्रगती पहाता, या दोन्ही संख्येत, निश्चित भर पडलेली आहे. 

◾️जीवनात जेवढ्या विद्या व कला आत्मसात करता येतील, तेवढे व्यक्तित्व समृद्ध होते. व्यक्तीस समाजात मान- सन्मान, पद, पैसा प्रतिष्ठा प्राप्त होते, हे त्रिकालाबाधित सत्य आहे.  

◾️जर कुंडलीतील धर्म त्रिकोण, कलापोषक ग्रहांनी बलवान असेल, तर असा ओढा अधिक दिसून येईल. कारण या जातकाचा, व्यक्ती विकासाकडे अधिक ओढा असतो.यात " स्वान्त सुखाय " हा भाव अधिक असतो. हवा तो गुण मिळवण्यासाठी, जीवाचे रान करण्याची त्यांची तयारी असते. ते कलेची उपासना नव्हे, तपस्या करतात.  

◾️" बाळाचे पाय पाळण्यात दिसतात " ही म्हणही बहुतांशाने खरीच आहे. निसर्गतः ज्या कलेकडे व्यक्तीचा ओढा असतो त्या क्षेत्रात त्याची उत्सुकता असते. व त्या उत्सुकतेला जर योग्य खतपाणी मिळाले तर ती जोमाने फोफावते. व अंग गुणांचे चीज होते. अन्यथा ती तशीच खुरटते. अशा लोकांच्या मनात " मला हे करायचे होते, शिकायचे होते पण... तें राहूनच गेले " अशी खंत आयुष्यभर मानगुटीवर बसलेली असते. अर्थात ग्रहस्थितीने हे दान त्यांच्या पदरी बांधलेले असते, हेही तितकेच खरे आहे. 

◾️जसे उतार कोणत्या दिशेस आहे, हे वाहत्या पाण्यास सांगण्याची आवश्यकता नसते, ते नैसर्गिक रित्या उताराकडे वाहत जाते, तसें योग्य ग्रहस्थिती असता, व्यक्तीस, त्या कलेच्या उपासनेसाठी सुलभरीत्या मार्ग सापडतात व मार्गदर्शक मिळतात . 

◾️प्रत्येक ग्रहाचे गुणधर्म व वैशिष्ट्ये जर आपल्याला माहित असली तर कुठल्या विद्येत वा कलेत जातकास रस असेल वा कुठल्या कलेत तो पारंगत होईल याचा अंदाज करता येतो. 

◾️कलेच्या बाबतीत मुख्यत्वे शुक्राकडे पाहिले जाते. शुक्र हा जसा वैवाहिक सुखाचा, शृंगाराचा कारक आहे तसा तो सौन्दर्य, उत्तम रसग्रहण क्षमता, टापटीप, व्यवस्थितपणा, रसिकता, खानपान यात चोखंदळपणा, प्रत्येक काम कलात्मकतेने करणारा हा ग्रह, सर्व प्रकारच्या हस्तकला, संगीत,अभिनय, मनोरंजन याचा कारक आहे. गायन, वादन, व नृत्य या त्रयीस संगीत म्हणतात. या मुळे कलेची तिन्ही अंगे शुक्राच्या अंमलाखाली येतात. 

◾️वृषभ, तुला या शुक्राच्या स्वराशी असून, मीन ही उच्च रास व कन्या ही नीच रास आहे. कलागुणांचा विचार करता तुला राशीं सर्वात अधिक उत्तम फलदायी ठरताना दिसते. या राशीत वर वर्णन केलेले गुण अधिक ठळकपणे दिसतात. कारण हीं वायुतत्वाची रास असल्याने कल्पक रास आहे. व कल्पकता तर कलेचा आत्मा आहे. 

◾️ज्यांचा शुक्र उत्तम असतो, त्यांचे हस्ताक्षर उत्तम असते. हस्ताक्षरास मोत्यासारखे कां म्हणतात हे यांच्या अक्षरावरून कळते. मला तर, माझ्या विदयार्थी दशेत, एक जुन्या पिढीतील वृद्ध कीर्तनकार "आमच्या वेळी अक्षर पाहून मुलगी देत असत "असे सांगायचे. त्यावेळेला त्याचा अर्थ कळत नसे. आज मात्र हस्ताक्षरवरून शुक्र कसा आहे ? , मुलगी सुखी राहील कि नाही ? याचा अंदाज घेत असावेत हे लक्षांत येते ▪️ पण इथे शुक्र शुद्ध असणे अपेक्षित आहे. तो स्वराशीचा असला तरी जर पापग्रहांनी पीडित असेल तर अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. काहींना काही तरी गालबोट लागलेले असते. अक्षर खूप चांगले असले तरी, कोऱ्या कागदावर लिहिताना जर ओळी खालून वर वा वरून खाली तिरप्या लिहिल्या गेल्या तर शुक्र बाधित आहे असे खुशाल समजावे. माझ्या परिचयातल्या एक गायिका होत्या. आवाज खूप गोड होता पण पट्टीत कसे गायचे हे बरेचदा त्यांना कळत नसे. जेव्हा तारस्वरात गाणे यायचे तेव्हा त्यांचा आवाज फाटून गाण्याचा विचका व्हायचा. हाहि प्रकार शुक्र बाधित असल्याचा आहे. बेसूर, बेताल गायन हेच दर्शवते. ▪️शुक्र बाधित असला कि कलेच्या प्रत्येक क्षेत्रात असे होऊ शकते. शुक्रासोबत जर शनी असेल तर कलेची आवड फक्त चार चौघांपर्यंत मर्यादित राहते. काही लोकांना प्रसिद्धीचे वलयच नको असते वा काही आपल्या जिद्दीला अपयश आले म्हणून मुरड घालतात. हाच शुक्र शनी सोबत नवपंचम योग करीत असेल तर मात्र चित्र बदलते. शनी चिकाटीचा कारक असल्याने गाण्यात गेयता वाढते. शुक्र व मंगळ युति मूक राशीं सोडून धनस्थानी असल्यास हे लोक उत्तम गाताना दिसतात. सनई, बासरी सारखी मुख वाद्येही ते वाजवू शकतात. 

◾️तंतुवाद्य हेही आवाजाचे एक वेगळे आकर्षण निर्माण करणारे वाद्य आहे. नेपच्यून हा ग्रह या वाद्याची भुरळ पडणारा ग्रह आहे. नेपच्यून हा अतींद्रिय शक्तीचा, अतिशय संवेदनशील, अंतस्फूर्तीचा कारक ग्रह आहे. तंतुवाद्याची नादमधुरता नेपच्यून प्रभावित व्यक्तीला खूप मोहित करते. विशेषतः जर तूळेचा नेपच्युन या बाबत फार संवेदनशील ठरतो.

तूळेचा नेपच्यून असणारे जातक संवेदनशील असल्याने उत्तम कवि होऊ शकतात. एखाद्या कलेची ते समर्पित भावनेने उपासना करतात. त्या क्षेत्रास ते स्वतःस वाहून घेतात. लग्नी तूळेचा नेपच्यून असणारे, पूर्ण समर्पित एक संतकवी माझे पाहण्यात आहेत.  

◾️शुक्र शुभस्थितीत असता जातकास चित्र कलेची आवड असते. ते उत्तम मूर्तिकारहि होऊ शकतात. फोटोग्राफी करतानाहि कॅमेऱ्याचा अँगल, विषयवस्तूची पार्श्वभूमी, याची रंगसंगती, योग्य प्रकाशव्यवस्था याचा कलात्मकतेने केलेला वापर विशेष लक्ष वेधून घेतो . त्यांची इतर कोणत्याहि कलेची उपासना नसली तरी तिचे मूल्यमापन योग्य रीतीने करण्याची यांची क्षमता असते. शास्त्रीय गायन ऐकतांना, अनेक ताना घेऊन जेव्हा गायक समेवर येईल, तेव्हा शुक्र सुस्थितीत असणारे श्रोतेच त्याचा आनंद उपभोगू शकतील. ज्यांचा शुक्र दुर्बल आहे त्यांना उगाच आपली झोपमोड होते आहे असे वाटू शकते. कारण कलेचा आस्वाद घेण्याची क्षमता दुर्बल झालेली असते.

      ◼️ वाद्यांचेहि  2 प्रकार आहेत  1.स्वरवाद्य व 2. तालवाद्य. नावाप्रमाणे ज्या वाद्यातून, सा  रे ग  म प ध नि सां  या स्वरांचा अविष्कार होतो. सरगम, राग, नोटिफिकेशन वाजविले जाते,  ती स्वरवाद्ये होत. तर ज्या वाद्यातून ठेका वाजवून साथ केली जाते, निरनिराळे ताल वाजवून,  गायनात रंगत आणली जाते ती घनवाद्ये वा तालवाद्ये होत. तबला, मृदंग, ड्रम, ढोलक, नाल, ढोलकी ही वाद्ये या सदरात मोडतात.या  वाद्यात  कौशल्य प्राप्त करण्यासाठी,  शुक्रासोबतच मंगळ पण बलवान व शुक्राशी शुभसंबंधित असावा.
     
◼️ नृत्य,  हा सुद्धा कलेचा अविष्कार असून,  हा पूर्णपणे मंगळाच्या अंमला खाली येतो. विशेषतः मंगळ बलवान असून,  जर पंचमस्थानात असेल,  तर नृत्यकलेस प्रेरक ठरतो. पंचम स्थान,  हे मुळातच विद्या, कला, क्रीडा कौशल्य याचा बोध करणारे स्थान आहे. मंगळ हा,  व्यक्तिगत क्रीडा कौशल्याचा कारक ग्रह,  या स्थानात बलवान असल्यास व्यक्ती, गोळाफेक, भालाफेक, अंगविक्षेप प्रधान कला,  जसे शरीरसौष्ठव, योग, व्यायाम,नृत्य या क्षेत्रात प्राविण्य मिळवते. बरेच विख्यात खेळाडू वा नट नर्तकी यांच्या कुंडल्यांचा अभ्यास केला असता, मंगळाचे हे वैशिष्ट्य लक्षांत येते.
          ◾️या बाबत एक किस्सा या स्थानी नमूद करणे विषयोचीत होईल.

         ◾️माझ्या एका मित्रानी,  त्यांच्या मुलासाठी सांगून आलेल्या, एका मुलीची पत्रिका,  गुणमेलनासाठी आणली. त्या पत्रिकेत, पंचमात बलवान मंगळ होता. त्यावरून,  मुलीस नृत्य कला अवगत असावी, असे मी मत व्यक्त केले असता, ती नृत्य करीत नसून, योगाचे क्लास चालवते असे त्यांनी सांगितले. अर्थात योग वा नृत्य,  दोन्ही कलांचा आत्मा,  शारीरिक अंगविक्षेप हाच आहे. म्हणजे निदान बरोबर होते, पण व्याख्या चुकली होती. मी हा मुद्दा, त्यांना विस्ताराने कथन केला. या मंगळामुळे,  कुंडली बरोबर असल्याचे शिक्का मोर्तब झाले. पण स्त्री पंचमात मंगळ असता, बाळंतपणात सिझरिंग, धावपळ होते,  ही पण त्यांना कल्पना दिली. त्यांचे व माझे घरोब्याचे संबंध असल्याने, जातांना त्यांनी "आपण नृत्य कलेचा उल्लेख केलात. काहो ! आम्हास ही,  बोटावर तर नाही ना नाचवणार ? "असा विनोद केला. त्यांच्या या विनोदामुळे, ती पत्रिका चांगलीच लक्षांत राहिली.

    पुढे लग्न झाले. सुनेला दिवस राहिले. वै द्यकीय देखरेखीखाली,बाळंतपणाची तारीख जवळ यायला लागली. तसें मी सांगितलेले, त्यांनी स्मरणात ठेवल्यामुळे, त्यांनी " काही गडबड होऊ शकते ",  हे गृहीत धरलेलेच होते .

    नेमके तसेच झाले. निर्देशित तारखेअगोदरच,  सुनेस त्रास व्हायला लागला व सिझरिंग करावे लागले. मुलगी झाली होती. या घटनांची मला काहीहि कल्पना नव्हती.

     नातीची पत्रिका बनवण्यासाठी,  त्यांनी फोनवर सूचित केले. जन्म अमावास्येचा असून, जन्मवेळ जर 4 मिनिटे उशिरा असती तर, 2-3 शांतिपूजा टळल्या असत्या. जेव्हा ते पत्रिका न्यावयास आले, तेव्हा सलोख्याचे सम्बध असल्याने,  " सुनेने जर 4 मिनिटे कळ काढली असती तर या शांतिपूजा टाळल्या असत्या " असा मी उल्लेख केला. त्यावर ते म्हणाले, " काय सांगू साहेब ! सुनेला वेळेअगोदरच,  खूप त्रास जाणवायला लागला. व संकीर्ण परिस्थिती पाहून,  डॉक्टरानी तडका -फडकी ऑपरेशनचा निर्णय घेतला. आपण,  सुनेस बाळंतपणात त्रास होऊ शकतो असे अगोदरच भाकीत केल्याने,  मी अलर्ट होतो."

           " मी भाकीत केले होते ? " मी पृच्छा केली.  कारण मध्यन्तरी बराच काळ गेला होता म्हणून मी विसरलो होतो. मग मलाच आठवले. ऑपरेशन -पंचमात मंगळ -आम्हाला ती बोटावर तर नाचवणार नाही ना ! -हा  विनोद. सर्वकाही आठवले.

            माझा ठोकताळा त्यांनी लक्षांत ठेवला होता. अशी ही पंचमातल्या मंगळाची दुसरी बाजू.
      
◾️तृतीय स्थान,  हे छंद दर्शविते. पंचम स्थान,  हे कलाविष्कारासाठी उत्तमच. दशम स्थानात,  जर कलाप्रेरक ग्रह असले तर कला हे उदरनिर्वाहाचे साधन बनण्यास हरकत असू नये. अभिनया साठीहि शुक्र प्रेरक  समजला जातो. रवि +शुक्र +बुध ही  त्रयी, अभिनय  कलेसाठी फार पोषक समजली जाते. हिंदी चित्रपट सृष्टीत असे कितीतरी अभिनेते आहेत,  कि ज्यांचे कुंडलीत, हा योग विद्यमान आहे.

       ◾️ रवि म्हणजे प्रसिद्ध होण्याची आकांक्षा, स्टेज डेअरिंग, शुक्र म्हणजे कला, बुध म्हणजे हावभाव व सादरीकरण कौशल्य,  असा हा  त्रिवेणी संगम आहे असे म्हणता येईल.

      ◾️अर्थात, कोणत्याहि कलेस उत्तेजन, प्रोत्साहन हे आवश्यकच आहे नव्हे,  ते कलेचे जीवनसत्व आहे. योग्य मार्गदर्शन व उत्तेजन मिळाल्या शिवाय,  कलेचे चीज होत नाही.

         कथा, काव्य, वात्रटिका, नाटक,  कादंबरी, वा विनोद प्रचुर लिहिणे , असे विविध वाङ्मय प्रकार आहेत. लेखन ही एक कलाच आहे.

       ◾️ तृतीय वा पंचमस्थानात जो ग्रह राशीं स्थानदृष्ट्या बलवान असेल, त्याच्या कारकत्वा नुसार, लेखनाचा नैसर्गिक ओढा त्या विषयाकडे असेल व   जातकास लेखनाची प्रेरणा निर्माण होईल, असे स्थूलमानाने म्हणता येईल. ग्रहा नुसार,  जातकाचा कल,  कुठल्या प्रकारच्या लेखनाकडे राहील, याचा अंदाज,  ग्रहांच्या,  खाली नमूद केलेल्या,  स्थायी भावानुसार करता येईल.

🔹रवि -न्याय, अधिकार, शिस्त, नेतृत्व, ज्ञान वर्धक.

🔹चंद्र - करुण रसप्रधान, भावना प्रधान, आनंददायक लेखन.

🔹मंगळ -वीररस प्रधान, शौर्यकथा, देशभक्ती, वीरगाथा लेखन.

🔹बुध -ललित लेख, विनोदी वाग्मय, वात्रटिका, फार्स, विनोदी नाटकें, चुटकुले.

🔹गुरु -विद्वत्तापूर्ण, गहन, दार्शनिक, धार्मिक, आध्यत्मविषयक, भक्तिरसपूर्ण लेखन, सामाजिक लेखन.

🔹शुक्र -शृंगार रसपूर्ण, रोमँटिक, लावण्या, प्रेमकथा, कादंबऱ्या. सिनेपटकथा. लेखन.

🔹शनी - रहस्यकथा, कुटकथा, गूढकथा.

🔹राहू - तंत्र मंत्र रहस्य लेखन, अघोरीं विद्या, काळी विद्या, भीतीकथा, बीभत्स रस युक्त लेखन.

🔹केतू -मोक्ष, अध्यात्म, विरक्ती विषयक लेखन.

🔹हर्षल -क्रांतिवादी, संशोधनात्मक, नवी दिशादर्शक लेखन.

🔹नेपच्यून - गूढ व संवेदनशील, गद्यापेक्षा  पद्यास प्रधानता देणारे  लेखन.

     कला वा  विद्या यांचे खऱ्या अर्थाने सार्थक होण्यासाठी, खाली नमूद केलेल्या चार सूत्रांचा सुद्धा, कुंडलीच्या माध्यमातून विचार करणे क्रमप्राप्त आहे.

          ✴️ संबंधित कलेचे -विद्येचे ज्ञान  कितपत आहे ?

✴️ कला -विद्येस  लागणारी,  प्रगटीकरण क्षमता कितपत आहे ?,

✴️ त्यापासून,  आर्थिक प्राप्तीची बाजू कशी आहे ?

✴️ लौकिक प्राप्ती कशी आहे ?

           या सर्व सूत्रांचे सकारात्मक सहकार्य असल्यास, जातक उत्तमरीत्या नावलौकिक मिळवू शकतो. या पैकी,  एक बाजू जरी लंगडी असेल,  तर कुठे ना कुठे तरी मज्जाव होईल.

  🎯 शेवटी उत्तम कलाकार होण्यास उपासना, तीव्र इच्छाशक्ती, अथक प्रयास याच्या जोडीला,  ग्रहांचे पाठबळ हे हवेच.
             
              // इति शुभम  //


‌     



Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली