करिअर च्या वाटा निवडतांना



शिक्षण आणि करिअर 

 मनुष्य हा प्रगतीशील व बुद्धिवादी  प्राणी आहे. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, तो निरंतर प्रगती करीत आहे. विद्या, ज्ञान, संस्कार ही शिक्षणाचीच देन असल्यामुळे, जीवनात शिक्षणाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. मानवाने केलेली प्रगती व तिला अनुसरून, ज्ञानाच्या वाढलेल्या शाखा, यामुळे शिक्षणाचाहि विविध अंगाने विस्तार झाला आहे. एकेकाळी मोफत मिळणारे शिक्षण, बदलत्या काळानुसार, बरेच खर्चिक झाले असून बाळाचा जन्म झाल्याबरोबर, पालकांना, त्याचे शिक्षण उत्तम व्हावे अशी काळजी जात्याच निर्माण होते. कारण शिक्षणाच्या निकषावर, त्याच्या जीवनाचे, उपजीविकेचे, यशस्वितेचे भवितव्य अवलंबून आहे, ही प्रत्येकाची धारणा असते.

 💢 जन्मकुंडली व त्यात दर्शविलेले ग्रहमान, याबाबतीत निश्चितच मार्गदर्शन करू शकतात. नव्हे प्रत्येक पालकांनी,  बाळाचा जन्म झाल्या बरोबर, कुंडलीच्या माध्यमातून जातकाचे स्टेटस, शिक्षण, विवाह, संतती, व्यवसाय, सामाजिक प्रतिष्ठा यासंबंधीचे, ज्योतिष तज्ञाद्वारा व्यक्त केलेले अंदाज, जरूरच विचारात घ्यावेत. त्यावरून जातकाची बौद्धिक क्षमता किती आहे ?,  त्याला कुठल्या ज्ञान शाखेची आवड आहे ? त्यानुसार त्याला योग्य शिक्षण मिळावे, यासाठी, सुयोग्य नियोजन करता येईल.

💢 जन्म कुंडली नुसार, लग्नेश बलवान असून, लग्न स्थानात शुभ ग्रह असता, जातकास कोणत्याहि क्षेत्रात सहज यश मिळण्याची शक्यता असते. कारण लग्न बलवान असेल, तर कुंडलीतील इतर ग्रह बऱ्यापैकी सहकार्य करताना दिसतात.

▪️ तृतीय स्थान हे पराक्रमाचे स्थान असल्यामुळे, ते कामाचे चिकाटी व उरक दर्शवणारे स्थान आहे. तृतीय स्थान बलवान असल्यास, अभ्यास असो वा काम, जातक तल्लीनतेने करतो.

▪️ चतुर्थ स्थान प्रारंभिक शिक्षणाचे, पंचम स्थान हे पदवी शिक्षणाचे, नवम स्थान, हे पदव्युत्तर शिक्षणाचे मानले जाते. या प्रत्येक स्थानाच्या भावेशाचा व त्या स्थानातील ग्रहांचा राशी, अंश, नवांश दृष्ट्या विचार केला असता, कोणते शिक्षण कशाप्रकारे होईल ? याचा अंदाज येतो. कारण शिक्षणाचा कालखंड हा वयाच्या सहाव्या वर्षी प्रारंभ होत असला तरी, 24- 26- 28 वर्षापर्यंत शिक्षणात आयुष्य जाते. हा प्रदीर्घ कालावधी कसा जाईल ?  याचा अंदाज, वरील स्थानावरून निश्चित करता येतो. 

💢 सर्व ग्रहात गुरू ग्रहाला, अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण गुरू नैसर्गिक शुभग्रह असून, ज्ञान शिक्षण, संततीचा कारक आहे.

▪️ ग्रहांच्या परस्पर संबंधामुळे होणाऱ्या योगात आपण “ नवपंचम योग “ सर्वश्रेष्ठ मानतो. गुरु महाराजांना, ते ज्या स्थानी आहेत, त्यापासून पाचवी, सातवी, नववी दृष्टी असते. गुरु दृष्टीला “ अमृत दृष्टी “ असे म्हटले आहे.

▪️ कुंडलीच्या 1,5,9 या स्थानाना, “ धर्म त्रिकोण “ म्हणतात. या तीन स्थानांपैकी, कुठल्याहि स्थानात गुरु महाराज असता, त्या व्यक्तीचा व्यक्तित्व विकासाकडे, अधिक कल असतो. 

▪️ पंचमस्थान हे पदवी शिक्षणाचे व नवम स्थान हे पदव्युत्तर शिक्षणाचे असल्याने, या गुरु दृष्टीचा लाभ शिक्षणात निश्चितच  होतो.

 ▪️ मात्र यासाठी, गुरु लग्नस्थानाचा कारक ग्रह असावा.  राशी, अंश दृष्ट्या बलवान, नवांशातहि शुभ स्थितीत, व अशुभग्रह दृष्टी विरहित असावा. 

▪️ कुंडलीतील 2, 6,10 या स्थानांना “ अर्थ त्रिकोण “ म्हणतात. यापैकी कोणत्याहि स्थानात, गुरु महाराज असून, ते वर सांगितल्याप्रमाणे, शुभ स्थितीत असता, नोकरी देणारे षष्ठस्थान, कर्माशी संबंधित दशमस्थान, तसेच धनसंग्रह करणारे धनस्थान, यांना गुरुदृष्टीचा लाभ होतो.

 ▪️ या आगळ्या - वेगळ्या वैशिष्ट्यांमुळेच, गुरु महाराजांना दोन-तृतीयांश कुंडली शुभ करणारा ग्रह, असे म्हटलेले आहे.

▪️ अष्टकवर्गानुसार, पंचम भावातील गुण, पंचमेश ज्या स्थानी आहे त्या भावातील गुण, व कारक गुरू ज्या स्थानी आहे त्या भावाचे गुण, यांची बेरीज 84 पेक्षा अधिक असावी.

 तसेच प्रत्येक भावात, पंचमेशाने किमान 4 व गुरुनेहि 5 वा त्यापेक्षा अधिक गुण, दिलेले असावेत. यावरून पदवीपर्यंतचे शिक्षण कसे होईल ? याचा अंदाज येऊ शकेल. याच पद्धतीने आपण पदव्युत्तर शिक्षणासाठी, नवम स्थानाचाहि स्वतंत्र विचार करू शकतो. 

 ▪️ अष्टकवर्गाप्रमाणे विचार केल्यास, कुंडलीचे नवम, दशम, व लाभस्थान अनुक्रमे, भाग्य, कर्म व कर्मापासून मिळणारा लाभ, हे दर्शवणारे असल्या मुळे, जर या 3 स्थानात 28 वा त्यापेक्षा अधिक गुण असतील तसेच, यातील स्थानांच्या भावेशांनी, आपापल्या भावास, 4 -5 असे समाधान कारक गुण दिलेले असतील तर, त्या जातकाचे जीवन आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सफल आहे, असे म्हणता येईल.

 ▪️ पंचम स्थान हे शिक्षणाचा कल दाखवत असल्यामुळे, पंचमात रवि बलवान असता, तांत्रिक शिक्षणाकडे ओढा असतो, मंगळ बलवान असता क्रीडाक्षेत्र, योग, व्यायाम, नृत्यकला तंत्रशिक्षण यात जातकाचा , विशेष रस असतो. 

▪️ पंचमातील बलवान बुध, ललित लेख, कविता, विनोदी साहित्य, अकाउंटिंग या क्षेत्राची आवड दर्शवितो. 

 ▪️ पंचमात बलवान गुरु असता, शिक्षण क्षेत्राची आवड असते. संस्कृत विषयातहि अशा जातकांना रुचि असते. 

 ▪️ वस्तुत: उद्योग - कर्माचे स्थान, आपण दशम स्थान मानत असलो तरी, बलवान गुरु, लग्न – पंचम - नवम स्थानात असल्यास, अशा जातकांना, शिक्षकी पेशाची आवड असते, वा त्या क्षेत्रात ते कार्यरत असतात.

असाच एक विशेष योग, बुधाचे बाबतीतहि सांगता येईल.

तृतीयात बुध बलवान व शुभ स्थितीत असता, जातक समाचार पत्रे, संदेशवहन, वार्ताहर, दळणवळण क्षेत्र, टेलिफोन, डाक विभाग, आकाशवाणी, अशा क्षेत्रातहि पाहण्यात आलेले आहेत.

▪️ तसेच व्ययस्थान, आपण अशुभ स्थान मानतो. दशमेश जर व्यय स्थानात असेल तर नोकरी -व्यवसायात, सहजासहजी जम बसत नाही.  असे असले तरी, वैद्यक व्यवसाय, पोलीस यासाठी हा योग उपयुक्त ठरतो. वैद्यक क्षेत्रासाठी कष्ट स्थानहि जर बलवान असेल, तर फारच उत्तम.

 💢 जातकाच्या कुंडलीत, जर गजकेसरी योग, पंचमहापुरुष योग असेल तर, जातकाचे जीवन निश्चित उत्तम दर्जाचे असते. पंच महापुरुष योगातील मंगळामुळे क्रीडाक्षेत्र, सुरक्षा विभाग, बुधामुळे  साहित्य क्षेत्र, वक्तृत्व कला, गुरुमुळे ज्ञान व अध्यात्म क्षेत्र, शुक्रामुळे अभिनय व कलाक्षेत्र तसेच, शनी मुळे कायदा, न्याय, राजकारण या क्षेत्रात लक्षणीय प्रगती होते. 

▪️ दशम स्थान हे बहुदा सर्व ग्रहांना आवडत असल्यामुळे, त्यात ▪️ बलवान रवि असता, राजकारण, केंद्रसरकारी नोकऱ्या, सिव्हिल क्षेत्रात, अधिकाराची पदे प्राप्त होतात. 

▪️ बलवान चंद्र असता, बहुजन संपर्ककिय व्यवसाय, राज्य सरकारच्या नोकऱ्या, सेवासुरुश्रा विभाग, प्रवाही पदार्थ संबंधित व्यवसाय, नाविक दल ही क्षेत्रे लाभदायी ठरतात.

 ▪️ मंगळामुळे सेना, मिल्ट्री, सुरक्षा विभाग, वैद्यक क्षेत्र, क्रीडा विभाग, शल्यचिकित्सा हे क्षेत्र उत्तम असते.

▪️ बुधामुळे फायनान्स क्षेत्र,  साहित्य क्षेत्र,  संभाषण कौशल्यावर आधारीत विविध क्षेत्रे, अंकपाल ही क्षेत्रे लाभदायी ठरतात.

▪️ बलवान गुरु मुळे सर्व सन्मानजनक क्षेत्रे, वरिष्ठ श्रेणी अधिकारी, शिक्षण क्षेत्र, अध्यात्म क्षेत्र यात गती येते.

▪️ लग्नस्थानातील वायू राशीचा, विशेषत: मिथुनेचा गुरु, स्पर्धात्मक परीक्षेत यश देणारा ठरतो.

▪️ चतुर्थातील राहु स्पर्धात्मक परीक्षेत अपयश देतो.  

▪️ बलवान शुक्रामुळे कला, अभिनय, संगीत यात नाव लौकिक प्राप्त होतो. 

▪️ बलवान शनीमुळे,  यशस्वी राजकारणी, उद्योग पती, न्यायदान क्षेत्र यांचा विशेष लाभ होतो. 

▪️ दशमात राहू असता, विशेषत: तो वृषभ अथवा मिथुन राशीत असेल तर, राजकारणात अशा जातकांना गती असते.

▪️ दशमात नेपच्यून असता, असे जातक मादक पदार्थ, रसायन, कृषी उपयोगी औषधे, विषारी केमिकल्स अशा क्षेत्रात दिसतात. 

▪️ पारंपारिक ज्योतिषानुसार जन्मकुंडलीत अग्नि राशीत व चर राशीत जर ग्रहाधिक्य असेल तर, जातकाची स्वतंत्र व्यवसाय करण्याची प्रवृत्ती असते.

▪️ पृथ्वी तत्वाचे राशीत व स्थिर राशीत ग्रहाधिक्य असेल तर, नोकरीची वृत्ती असून, आवक स्थिर धोरणाची असते.

▪️ जर द्विस्वभाव राशीत ग्रहाधिक्य असेल, तर अनेक धन्द्यानी, आवक असण्याची शक्यता असते.

▪️ जर वायू राशीत ग्रहाधिक्य असेल तर, बौद्धिक विषयात आवड वा तत्सम उद्योग धंदे असतात.

▪️ अष्टकवर्गनुसार, जर षष्ठस्थानास, सप्तमापेक्षा अधिक गुण असतील तर, जातक नोकरीं करतो.

 ▪️ याउलट, सप्तमस्थानास षष्ठ स्थानापेक्षा, अधिक गुण असतील तर, जातक व्यवसाय करतो.

▪️ जर दोन्ही स्थानाच्या गुणात फार फरक नसेल, तर (1/2 गुणांचा फरक ) तर जातक धड नोकरीं नाही, धड व्यवसाय नाही.अशा स्वरूपाची कामे करतो. जसे- कामाचे कॉन्ट्रॅक्ट घेणे, व मोबदला घेणे, असे उपजीविकेचे साधन असते .

▪️ नोकरी-व्यवसाय यातील यश कसे राहील ? हे कर्म स्थानातील व लाभस्थानातील गुणसंख्ये वरून लक्षात येईल. या दोन्ही भावात 28 पेक्षा अधिक गुण असता, यश मिळेल. 

💢 नोकरी - व्यवसायाबाबत, अजून काही विशेष नियम सांगता येतील.

▪️ षष्ठेश व दशमेश एकमेकांच्या शुभयोगात असता, वडील व मुलाचा व्यवसाय एकच असतो वा, पारंपारिक व्यवसाय असू शकतो.

▪️ दशमेश वा दशम स्थानावर शनि व राहुची दृष्टी असता, वा तेथे, ते विद्यमान असता, धंद्यात अपयश येण्याची शक्यता असते.

▪️ कुंडलीतील चंद्र, शनीच्या प्रभावात असता, नोकरीत प्राधान्य द्यावे. स्वतंत्र धंदा करू नये.

▪️ चतुर्थ वा दशम स्थानाशी जितक्या ग्रहाचा संबंध येईल, त्या त्या ग्रहानी निर्देशित, धंदे होण्याची संभावना असते.

▪️ चंद्र, बुध, शनि राहूचा संबंध दशमाशी आल्यास,  नोकरीचा योग येतो.

▪️ कुंडलीत रवि मंगळ, परस्परांशी  शुभ संबंधित असता, वरिष्ठांशी चांगले पटते. ते एकमेकांच्या केंद्री वा अशुभ योगात असता,  वरिष्ठांशी खटके उडतात.

▪️ तृतीय शुभ ग्रह असता, उपजीविकेचे साधन उत्तम असते.

▪️ अष्टम स्थानी शुक्र असता, नोकरीत कष्ट करण्याऐवजी, तिचे अन्य फायदे मिळवण्याची प्रवृत्ती असते.

▪️ पंचमेश आणि दशमेश शुभ संबंधित असता, शिक्षण क्षेत्राशी संबंध येण्याचा संभव असतो.

▪️ कुंडलीत नवमेश व दशमेश यांची युती, नवमात, दशमात वा लग्नी वा पंचमात असता, अत्यंत शुभ समजले जाते.  हा “ कर्म - धर्म “ संयोग होय. धनु लग्नात हाच योग “ बुधादित्य योग “ रुपाने प्रगट होतो. या योगात उन्नतीसाठी फार परिश्रम करावे लागत नाहीत. कारण भाग्य व कर्म यांची उत्तम जोड लाभलेली असते.

 💢 तशी या विषयाची व्याप्ती बरीच मोठी आहे. संपूर्ण विषय एका लेखात सामावणे शक्य नाही.

💢 काही विशिष्ट ग्रहयुतिमुळेहि, नोकरी व्यवसाया ची क्षेत्रे, निवडता येतात.

 ▪️ जसे शनि मंगळ युति , ऑपरेशन, अपघात, बंधू सुखास विरोध दर्शवणारी बसली तरी, तांत्रिक शिक्षणास, इंजिनीयर क्षेत्रास ही युति साहाय्यकारी ठरते.

▪️ तसेच बुध मंगळ युती, जातकास कठोर वचनी, त्वचाविकार देणारी असली तरी, तीव्र स्मरण शक्ती, गणित उत्तम असणारी, संगणक ज्ञान, आयटी क्षेत्र, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग या क्षेत्रात, यश देणारी असू शकते.

▪️ रवि बुध शुक्र या तीन ग्रहांची युति, अभिनय क्षेत्रासाठी, यश देणारी ठरते.

▪️ असे अजून बरेचसे योग आहेत, कि ते, जातक कोणत्या क्षेत्रात जाईल हे दर्शवण्यासाठी, मैलाचे दगड म्हणून काम करतात.  ज्योतिष प्रेमी, अभ्यासू व्यक्तीने, अशा योगांचा संग्रह केला पाहिजे. यामुळे नोकरीं –  व्यवसाया बाबत मार्ग दर्शन करणे, बरेच सुलभ होते.

💢 थोडक्यात अशा विविध योगाच्या माध्यमातून, कुंडलीचा अभ्यास केल्यास, जातकाच्या भवितव्याची दिशा, आपण निश्चित करू शकतो.  व त्यासंबंधी, पालकांना मार्गदर्शन करू शकतो. व या मार्गदर्शनाच्या आधारावर, ते आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी, योग्य ती पूर्वतयारी करू शकतात.

💢 तूर्त तरी येथेच थांबू. 🙏

टीप : हा लेख " भविष्य दर्पण " दिवाळी अंक 2021 यात "  करिअरच्या वाटा निवडतांना " या नावाने नुकताच प्रसिद्ध झाला आहे.



   

  


Comments

  1. गुरूजी,
    खरच खूप महत्वाची माहिती आपण आपल्या बलाॅग द्वारे दिली आहे.
    शशिकांत वसंतराव घाटे, पुणे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली