जातकाचे स्वरूपाबाबत
" लग्नेश पापग्रह असला तरी स्वरूपाचे बाबतीत पापफळे देत नाही. "
💢 वरील विधान, बऱ्याचशा जुन्या पुस्तकातून वाचनात आले आहे.
💢 वास्तविक कोणताहि पापग्रह पापफळे देणार, ही सर्वसाधारण धारणा असते. मग पूर्व अभ्यासकांनी असे कां लिहून ठेवले असावे ? असा प्रश्न मनात साहजिकच निर्माण होतो.
💢 लग्न, लग्नेश, लग्नातील ग्रह जातकाच्या, चेहऱ्या - मोहोऱ्यावर, वृत्तीवर, अंगकाठी - शरीरयष्टीवर विशेष प्रभाव टाकतात., असे प्रथम स्थानाचे महिमान आहे.
💢 त्याप्रमाणे, आपण प्रथम स्थान पाहून, जातक आपल्या समोर नसल्यास, त्यांचे अंदाजहि बांधतो. व ते बऱ्याच प्रमाणात, वास्तवात उतरलेलेहि दिसतात.
💢 नमुन्यादाखल काही अंदाज पाहू.
💢 वृषभ, तूला लग्न असणारे जातक सहसा सुंदर असतात.
💢 कुंभ लग्नाच्या, विशेषतः स्त्रिया सुंदर असतात. चेहरा साधारणतः लांबोळा असतो.
💢लग्नी चंद्र वा कर्क लग्न असता, चेहरा साधारणतः गोल ( पुनवेचा चंद्र ) असतो.
💢 मिथुन, कन्या लग्नाच्या जातिका सुंदर असतात. वंशपरत्वे वर्णात थोडा फार फरक पडू शकतो. पण नाकी डोळी नीट. संवादकौशल्य उत्तम असल्याने हे लोक आपली छाप सोडून जातात.
💢 लग्नी गुरु असता सुंदर, शांत, सौम्य चेहेऱ्याचे, व्यवस्थित राहणारे, पण फार नट्टापट्टा न करणारे, तारुण्यात बॅलन्सड - स्थूलतेच्या सीमा रेषेवर असणारे पण नंतर, सीमा ओलांडणारे असे पाहण्यात येतात.
💢 लग्नी शुक्र असता, सुंदर असतात विशेषतः डोळे खूप सुंदर असतात.
💢 लग्नी वृश्चिक राशीं असतात. उंची सहसा बेताची सापडते.
💢 लग्नी मंगल असेल तर, सहसा उंच असतात. पुरुषाचे बाबतीत उत्तरार्धात केस मागे जाऊन, कपाळ पुढे आल्यासारखे वाटते.
💢 पुरुषाचे बाबतीत लग्नी मंगळ वा रवि असता, टक्कल पडण्याची अधिक शक्यता असते.
💢 फार मोठया पदावर असून काही जातक, उंचीने जरा कमी असतात. बहुदा त्यांचे लग्नी राहू असतो.
💢 स्त्रियांचे बाबतीत, लग्नी राहू असेल तर साज - शृंगाराची आवड अधिक असते.
💢 मकर लग्न असलेले जातक, काटक अंगकाठीचे, उंचीने मध्यम वा थोडे कमीच असतात. यांचे वजन, शरीरयष्टी बरेच वर्षे स्थिर असते.
💢 शनी प्रभावित व्यक्ती, सहसा जाड भुवयांची असते. काही जातकात नाक व हुनुवटीची ठेवण लक्ष वेधून घेते.
💢 लग्न व चंद्र दोन्ही समराशीचे असतील तर, व्यक्ती स्थूल होण्याची शक्यता अधिक असते. अशा व्यक्ती स्त्री असो वा पुरुष, सौम्यता, माया, ममता, सहृदयता यांची त्यांचेवर छाप असते. हे लोक फार कणखर नसतात.
💢 याउलट, लग्न चंद्र विषम राशीत असल्यास, सहसा स्थूलता येत नाही. स्त्री असो वा पुरुष, हे लोक कणखर, चपळ, माया ममतेपेक्षा कर्तव्य बुद्धीने वागणारे, ठाम निर्णय घेणारे असे असतात.
💢 जर लग्न व चंद्र यापैकी एक सम व एक विषम राशीत असेल. तर जातकात वरील दोन्ही व्यक्ती रेखाचे, संमिश्र स्वरूप सापडते.
💢 वरील सर्व वैशिष्ट्ये प्रत्येक जातकास लागू होतीलच असे नाही. पण बऱ्याचशा जातकांना मात्र ते लागू होतात.
💢 सर्व साधारणपणे, लग्नी शनी असता व्यक्ती सावळ्या वर्णाची, फार आकर्षक व्यक्तीमत्व नसलेली अशी असेल, अशी शनी महाराजांच्या स्वरूपानुसार धारणा होते. पण प्रत्यक्षात बरेचदा, तसें काही दिसत नाही. फक्त शनी महाराजांचे इतर गुण, जसे भयंकर परिश्रमी, काटकसरी, धोरणी, दूरदर्शी, राजकारणी, मनातले भाव चेहऱ्यावर दिसू न देणारी, अशी वैशिष्ट्ये दिसून येतात.
मग साहजिकच प्रश्न उद्भवतो की, याच्या लग्नी पापग्रह वा लग्नेश पापग्रह असता रूपाबाबत अंदाज कां चुकले ?
💢 शरीरशास्त्रानुसार, यांचे कारण असे सांगता येईल की आई -वडिलांच्या गुणसूत्रानुसार, अनुवांशिकतेनुसार संततीचा चेहरा बनतो. यातहि मुलगी सहसा वडिलांच्या चेहऱ्याशी साम्य असणारी, तर मुलगा आईच्या चेहऱ्याशी साम्य असणारा सापडतो. व असे असणे शुभहि मानले जाते.
काही बाबतीत याउलट हि सापडते. अनेक चित्रपट तारे - तारकांचा व त्यांच्या संततीचा विचार केला,( कारण ते सतत आपल्या डोळ्यासमोर असतात ) तर वरील विधानातील, तत्थ्य कळून येईल.
" शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी "
ही संतोक्ती सुद्धा हेच सांगते, की प्रत्येक जीवावर, त्याच्या जनकाचा प्रभाव असतो. त्यामुळे जातकाच्या चेहेऱ्या - मोहोऱ्यात, आई वडिलांच्या चेहेऱ्याचे साम्य येते.
मग लग्नी शनी महाराज असले काय वा ते लग्नाचे स्वामी असले काय ? आई वडील जर गौरवर्णी, आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतील, तर संतती सहसा आकर्षक व्यक्तिमत्वाची राहीलच.
💢 हाच विचार, लग्नी पापग्रह वा लग्नेश पापग्रह असला तरी, जातकाचे स्वरूपाचे बाबतीत पापफळे मिळत नाहीत, या सिध्दातामागे असावा.
Comments
Post a Comment