संततीसुखाची परिमाणे

                     ⚛️संतती सुखाची परिमाणे ⚛️

               


विवाह झाल्यानंतर, एखाद्या विशिष्ट अपेक्षित  कालावधीत, जर एखाद्या दांपत्यास संतती प्राप्त होत नसेल तर, त्यांना चिंतेचे सावट निर्माण होते. नेमके आपल्या भाग्यात काय आहे? हे समजून घेण्यासाठी, ते जेव्हा ज्योतिषाकडे येतात, तेव्हा दोघांच्या कुंडल्यातील ग्रहस्थिती, दोघांचा सप्तम भाव, सप्तमेशाचे स्थिती, कुंडलीतील शुक्र व गुरु यांची स्थिती, तसेच पंचमभाव, पंचमेश, सप्तम व पंचम स्थानातील ग्रह, शनि -मंगल- राहू- प्रजापति -नेपच्यून या ग्रहांनी कोणास प्रभावित केलेले आहे कां? क्रूर नक्षत्रात कोणकोणते ग्रह आहेत? D-7, D-9 कुंडल्या अशा सर्व ग्रह स्थितीचा विचार करून, आपण अंदाजाची दिशा निश्चित करतो.

         असा सर्व विचार करताना, स्त्रीच्या बाबतीत,तिची जननक्षमता कशी आहे?  तसेच पुरुषाची बीज क्षमता किती बलवान आहे? याचा विचार करणेहि क्रमप्राप्त असते.  हा विचार आपण कुंडलीच्या माध्यमातून करू शकतो. तो विचार कसा करता येईल? याबाबत काही मार्गदर्शक तत्वांचा, आपल्याला विचार करावा लागतो.

⚛️ त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला " स्पष्ट ग्रह " ही संकल्पना कळली पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या कुंडलीत शनी जर मकर राशीत असेल तर स्पष्ट शनि लिहिताना तो राशीत  किती अंश कला विकलांवर आहे.? याचा तपशील लिहिणे म्हणजे शनि स्पष्ट लिहिणे असा आहे.

 उदाहरणार्थ, मकर राशीत शनी 16 अंश 35 कला 18 विकलांवर आहे. तर याचा अर्थ शनी महाराजांनी धनु राशि भोगून, ते मकर राशीत आल्याने, स्पष्ट शनि  9 -16-35-18 ( पूर्ण भोगलेली राशी - अंश- कला -विकला ) असे लिहिले जाईल.◾️ एकदा स्पष्ट ग्रह कसा लिहावा हे कळले. म्हणजे, पुढील विषय समजण्यास सोपा होईल.


💢 पुरुषाची बीजक्षमता कितपत बलवान आहे हे पाहण्यासाठी, " बीजस्फुटाचा " वापर होतो. वर सांगितल्याप्रमाणे बीजस्फूट पाहण्यासाठी, पुरुषाच्या कुंडलीतील स्पष्ट रवि + स्पष्ट शुक्र + स्पष्ट गुरु = यांची बेरीज करावी लागते. ( आज-काल सॉफ्टवेअरच्या मदतीने हा तपशील अधिक सहजगत्या प्राप्त होतो ). ही बेरीज, आपल्याला राशी -कला -विकला या स्थितीत प्राप्त होते.

 ◾️ही बेरीज जर विषम राशीत व विषम नवांशात आली असेल तर बीजस्फूट उत्तम आहे, असे समजले जाते.◾️ याउलट,एक सम व एक विषम असता, त्यात काही अडचणी असू शकतात. ज्या मेडिकल तपासणी द्वारा दूर होण्याची संभावना असते.◾️ परंतु, ही बेरीज जर समराशीत व समनवांशात येत असेल तर, बीज स्फुट प्रजोत्पादनासाठी योग्य नाही, असे समजण्यात येते. 

 


💢स्त्रियांच्या कुंडलीत मात्र, आपल्याला त्यांची जननक्षमता पाहण्यासाठी, " क्षेत्रस्फुटाची " आवश्यकता असते. त्यासाठी त्या स्त्रीच्या कुंडलीतील स्पष्टचंद्र  + स्पष्ट मंगळ  + स्पष्ट गुरु यांची बेरीज करावी लागते.◾️ ही बेरीज जर समराशीत व समनवांशात आली, तर स्त्रीची प्रजननक्षमता चांगली आहे, असे समजले जाते.◾️ यापैकी एक समराशी असेल व दुसरे विषमराशीत असेल तर, प्रजनन क्षमतेत काही अडचणी असू शकतात. मेडिकलद्वारा  त्याचे परीक्षण करून, त्या दूर होण्याची संभावना असते.◾️ परंतु, या बेरजेतून येणारी राशी व नवांश दोन्हीहि विषम असतील तर, स्त्रीची प्रजनन क्षमता चांगली नाही,  असे समजण्यात येते.

 ⚛️ ही गणिते करताना,बरेचदा राशींची बेरीज 18, 21, 26 अशी येऊ शकते. अशा वेळेस, गोंधळून जाऊ नये. या संख्येतून 12 राशी वजा कराव्यात.  12 च्या प्रमाणात या राशी संख्येतून वजा करावे म्हणजे, राशी संख्या 18 येत असेल तर त्याची 6 , 21 येत असेल तर 9,  26 येत असेल तर 2 अशी घ्यावी.

 ही गणिते करताना एका राशीचे 30 अंश असून, प्रत्येक अंश 60 कलांचा, व प्रत्येक कला ही 60 विकलांची असते हे विसरून चालत नाही.⚛️ आता आपण बीजस्पूट काढण्यासाठी,एका जातकाची कुंडली घेतली आहे. कुंडली प्रमाणे त्याचा स्पष्ट रवि वृषभेत असल्याने, 1- 19- 49- 14 असा मांडला आहे. तर स्पष्ट शुक्र 0- 27- 45 -14 असा असून, स्पष्ट गुरु 3- 12- 13- 6 असा आहे. या तिन्ही ग्रहांच्या राशी अंश कला विकलांची बेरीज केली असता, ती 5- 9 -47- 34 अशी येते. म्हणजेच ही 6 ही समराशी असून कन्येचाच नवांश असल्याने समनवांश येतो. राशी नवांश दोन्ही सम असल्याने, बीज स्फुट निर्बल झाल्याचे दिसते. यामुळे, पुरुष प्रजोत्पादनास समर्थ नाही, असे म्हणता येईल.

💢 क्षेत्रस्फुट पाहण्यासाठी, आपण एका स्त्रीची कुंडली घेतली आहे. क्षेत्रस्फुट पाहण्यासाठी, स्त्री कुंडलीतील, स्पष्ट चंद्र +  स्पष्ट मंगळ + स्पष्ट गुरु यांची बेरीज करावी लागते. या स्त्रीचा स्पष्ट चंद्र 8-10-50-50 असा असून स्पष्ट मंगळ 3-9-2-6  असा आहे. तसेच स्पष्ट गुरु 9- 19- 11- 57 असा असून या तिघांची बेरीज 9- 9- 8- 49 अशी येते. म्हणजेच, बीजस्फूट मकर राशीचे असून, ते मीन नवांशात आहे. मकर राशि व मीन नवांश हे दोन्ही सम संख्येचे  असल्याने, क्षेत्रस्फूट सबल आहे. व स्त्रीची जननक्षमता चांगली आहे, असे म्हणता येईल. ⚛️ अशा प्रकारे स्त्री व पुरुष या दोघांची, प्रजननशक्ती किती सक्षम आहे? हे पाहण्यासाठी, बीजस्फूट व क्षेत्रस्फुट ही दोन परिमाणे, ज्योतिषाला खूप सहाय्य करतात. व या आधारे, दोघांपैकी, कुणास वैद्यकीय सहाय्य घेणे, अधिक जरुरी आहे,हे ज्योतिषी अधिक स्पष्टपणे सांगू शकतात.

◾️ सकाम  उपासना केल्याने, तीव्र इच्छाशक्ती निर्माण होते, अशी श्रद्धा असली तरी,शरीरदोष असल्यास, वैद्यकीय मदत अधिक प्रभावी ठरते, हे नाकारून चालत नाही.

💢 हा लेख जून 2023 च्या भविष्य दर्पण मासिकात प्रकाशित झाला आहे.


                                                                                                                      = पुंडलिक दाते, ज्यो. अलंकार.-942755299


Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली