महत्वाच्या टिप्स
💢 सर्व ज्योतिष्य अभ्यासकांना मार्गदर्शनपर महत्त्वाच्या टिप्स 💢
ज्योतिष शास्त्र हे इतर शास्त्रांपेक्षा जरा वेगळे आहे. दैवी संकेत असल्याशिवाय या शास्त्राची आवड वा त्याचा अभ्यास करण्याची लालसा मनुष्यात निर्माण होत नाही. आपण सर्व या क्षेत्रात आलोत, हा दैवाचा कौलच म्हटला पाहिजे. बरेच विद्यार्थी, आपला व्यवसाय -नोकरी सांभाळून या क्षेत्राचा अभ्यास करतात. त्यांना अभ्यासात सुलभता यावी, सरलता यावी म्हणून काही अनुभवजन्य टिप्स, मी या लेखाद्वारे देत आहे.
◾️ कोणतीही कुंडली काढताना, तिची मांडणी करताना, कुंडलीच्या नकाशाचे चित्र काढणे आवश्यक असते. बरेचदा, आपण घाईत असतो तो त्यामुळे ती आकृती प्रमाणबद्ध येत नाही. व आपल्याला, फलादेशासाठी,आयुष्यात बरेचदा ह्या आकृत्या काढाव्या लागतात. यासाठी, जर आपण एका विशिष्ट आकाराचा, रबरी शिक्काच बनवून घेतला तर, ही आपली समस्या दूर होते. रबर स्टॅम्प व इंक पॅड याचा खर्च, एकदाच होतो. परंतु, दरवेळेला आपल्याला आकृती काढण्याची जरूर पडत नाही. याची निकड ओळखून मी स्वतः साडेचार सेंटीमीटर बाय साडेचार सेंटीमीटर या आकाराचा, एक रबरी शिक्काच बनवून घेतला आहे. फक्त याशिकक्याच्या आकृतीत लिहिताना, आपल्याला अक्षर थोडे बारीक करावे लागते. बॉलपेंन चा पॉईंट पण बारीकच असावा लागतो.
आपल्याला त्याची नीट कल्पना यावी म्हणून, त्याच स्टॅम्पचे चित्र मी यासोबत देत आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याला, आपल्या नियमित अभ्यासक्रमाबरोबर, इतर ज्योतिषीय विषयावरील लेखनहि वाचणे आवश्यक असते त्यामुळे, त्याचा अनुभव अधिक परिपक्व होत जातो.
◾️परीक्षेच्या निमित्ताने आपण आपल्या अभ्यासक्रमातील ज्ञान तर मिळवतोच पण त्यासोबत, त्या ज्ञानाचे उपयोजन होण्यासाठी आपल्याला कुंडल्या पाहण्याचा सराव देखील करावा लागतो.
◾️ प्रत्येक ज्योतिषाला आपला अनुभव समृद्ध करण्यासाठी, आपण पाहिलेल्या, अभ्यासलेल्या कुंडल्यांचा संग्रह करणे आवश्यक असते.
◾️ त्यासाठी प्रत्येकाने एक वेगळी(टिकाऊ )वही वा रजिस्टर करावे. त्या रजिस्टर मध्ये अनुक्रमे कुंडली क्रमांक, जातकाचे नाव, त्याची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण, हे नमूद करावे. तसेच आपण ज्या दिवशी त्या कुंडलीचा अभ्यास केला अथवा त्याच्या नावाची नोंद केली, ती तारीख पण त्याच्यापुढे लिहावी. जरूर वाटल्यास, त्याचा संपर्क क्रमांक सुद्धा नमूद करावा.
◾️ अशा प्रकारचा संग्रह केल्यामुळे, आपल्याला अभ्यासासाठी हा तपशील केव्हाही उपयोगी पडतो. दरवेळेला, त्या जातकाला पुन्हा पुन्हा विचारावे लागत नाही.
◾️ मानवी जीवन हे अनेक शुभ अथवा अशुभ घटनांनी भरलेले आहे. तसेच,एकाची कुंडली ही दुसऱ्याच्या कुंडलीपेक्षा खचितच वेगळी असते. व प्रत्येक कुंडलीतून काहीतरी नवीन शिकायला मिळत असते. कुंडल्यांचा अभ्यास करताना अपघात योग,ऑपरेशन योग, नि :संतान योग, प्रेम प्रकरण योग, प्रेमभंगयोग, संन्यास योग, विविध आजाराविषयीचे योग, अकाल मृत्यूयोग मानसिक विकाराच्या कुंडल्या, त्वचाविकाराच्या कुंडल्या, प्रेमभंग, घटस्फोट, परदेशगमनाचे योग असे विविध योग आपल्याला कुंडलीच्या माध्यमातून अभ्यासावे लागतात.
◾️असे काही विशिष्ट योग असल्यास, त्या पत्रिकांचा एक वेगळा संग्रह करणे आवश्यक असते. कारण अशा प्रकारच्या संग्रहावरून आपला उत्तम अभ्यास होतो,असे निदर्शनास येते. ◾️ काही ज्योतिषी मी वर नमूद केलेल्या योगांप्रमाणे कुंडल्यांचा संग्रह करतात. तर काही ज्योतिषी लग्नवार कुंडल्यांचा संग्रह करतात. ◾️ मी स्वतः लग्नवार कुंडल्यांचा संग्रह करतो.
◾️ हा संग्रह कसा करावा?
बरेचदा काही कंपन्या दर जानेवारीला त्या वर्षाच्या डायऱ्या भेटी दाखल देतात. किंवा अशा डायऱ्या बाजारात देखील विकत मिळतात.
◾️ ज्या डायरीचा कागद टिकाऊ व उत्तम प्रतीचा आहे तसेच, जिथे बाईंडिंग उत्तम केलेले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक पानास त्याने एक एक तारीख लिहिलेली आहे. अशी डायरी निवडावी. मग ती कोणत्याही वर्षाची असली तरी चालते फक्त तिचे स्वरूप टिकाऊ असावे कारण आपल्याला बरेच वर्ष ती वापरावयाची आहे.
◾️ या डायरीत एकूण बारा महिने असून तारखेप्रमाणे त्यांची पानसंख्या असते. योगायोगाने ही बारा महिने व आपल्या कुंडलीची बारा लग्ने दोघांची समान संख्या असल्यामुळे जानेवारी महिन्यात मेष लग्नाच्या ते डिसेंबर महिन्यात मीन लग्नाच्या कुंडल्यांचा संग्रह करावा
.
◾️ मी, वर जे रबरी शिक्क्याचे वर्णन केले आहे अशा प्रकारचा आपण शिक्का वापरल्यास, साधारणपणे डायरीच्या एका पानावर आपण आठ कुंडल्यांचा तपशील लिहू शकतो. डायरी उघडल्यानंतर आपल्याला डावीकडचे व उजवीकडचे अशी दोन पाने एकाच वेळेला दिसतात. म्हणजे एकाच दृष्टीक्षेपात आपण एकाच लग्नाच्या सोळा कुंडल्या, एकाच वेळेस पाहू शकतो. ही पाने कशी तयार करावी एक नमुन्याचे चित्र मी या लोका लेखासोबत देत आहे..
◾️ प्रत्येकाच्या अभ्यासाची आपापली पद्धत असते. ज्याला जी पद्धत, सोयीची वाटते त्या पद्धतीने तो अभ्यास करतो. मला जी पद्धत सोयीची वाटली, ती मी आपल्या समोर विदित केली आहे. जर आपल्यालाही ही पद्धत, या सूचना अनुकूल व सोयीच्या वाटत असतील तर आपण याचा अंगीकार करावा. अन्यथा आपल्याला जे सोयीचे वाटत असेल त्याप्रमाणे आपण अभ्यासाची दिशा निवडावी.
◾️ हा लेख जर आपल्याला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर, आपण हा लेख व्हाट्सअप वर कायम न ठेवता,वेगळ्या सुरक्षित ठिकाणी सेव्ह करून ठेवावा. कारण बरेचदा मोबाईल बिघडतात, वा हरवले जातात त्याबरोबर आपला काही महत्त्वाचा डेटा ही गहाळ होत असतो. असे होऊ नये म्हणून, सर्वात महत्त्वाच्या टिप्स व दिशा निर्देश हे आपल्या पेन ड्राईव्ह मध्ये, लॅपटॉप मध्ये, हार्ड डिस्क मध्ये संग्रहित करणे उत्तम राहील.
|| शुभम भवतु ||
= पुंडलिक दाते, अकोला
Comments
Post a Comment