ज्यो. अलंकार परीक्षा -प्रबंध

 *💢 ज्योतिष्य अलंकार परीक्षा - प्रबंधाविषयी  💢*

 नमस्कार!

 श्री ज्योतिष्य संशोधन केंद्राच्या विद्यमाने, आपण सर्व विद्यार्थी ज्योतिष प्रवीण, विशारद,भास्कर या यशस्वीपणे परीक्षा देऊन, आता ज्योतिष्य अलंकार या परीक्षेचे परीक्षार्थी आहात. या परीक्षेच्या अभ्यासक्रमा नुसार, युट्युब वरील आदरणीय मॅडमचे व्हिडिओ, पाहून, मनन करून, त्यावरून नोट्स काढून, आपण अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोतच. यावेळी आपल्याला प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर जाऊन, परीक्षा द्यावयाची आहे. तसेच या परीक्षेची, यापूर्वीच्या परीक्षेच्या तुलनेत काठिण्य पातळी वाढलेली आहे.


◾️या परीक्षेत प्रबंधाचा समावेश असतो. या प्रबंधात एकूण 10 कुंडल्या असून आपल्याला, त्यांचा जन्मकुंडली, चंद्र कुंडली, नवांश कुंडली, जर त्या कुंडली धारकाच्या जीवनात जर काही समस्या असेल, तर त्या समस्येचा उकल करणारी, तत्सम वर्ग कुंडली, अष्टक वर्ग, याप्रमाणे अभ्यास करावयाचा आहे.

◾️आतापर्यंत शिकलेल्या ज्योतिष शास्त्रीय सिद्धांताचा उपयोग, तसेच, अलंकार परीक्षेच्या अभ्यासक्रमातून  शिकलेले सिद्धांत, याचे निकष वापरून, आपल्याला ह्या 10 कुंडल्या सोडवावयाच्या असतात. कुंडलीतील ग्रहस्थिती व ज्योतिष शास्त्रीय अंदाज, याचे कुंडलीच्या माध्यमातून सविस्तर वर्णन, विश्लेषण, लेखी स्वरूपात करावयाचे असते. व हा आपला प्रबंध, परिपूर्ण स्वरूपात, आपण जेव्हा प्रत्यक्ष परीक्षेला येतो, त्यावेळेला आदरणीय मॅडमला सादर करावयाचा असतो.

◾️ हा प्रबंध या परीक्षेचा अविभाज्य घटक असल्याने, परीक्षेच्या गुणपत्रिकेत या प्रबंधाच्या गुणांचा समावेश असतो. त्यामुळे प्रबंध तयार करणे हे अनिवार्य ठरते.

💠 या प्रबंधात  विशिष्ट व्यवसायावर आधारित  अशा 5 कुंडल्या करावयाचा असून त्यात  *(1) शिक्षक (2) डॉक्टर  (3) वकील (4) वार्ताहर  (5) सैनिक* यांच्या कुंडल्या असाव्या लागतात. हे संस्थेने नेमून दिलेले विषय आहेत. *त्यात बदल करता येत नाही*.

💢 काही विदयार्थ्याना डॉक्टर कोणत्या क्षेत्रातील, शिक्षक की प्राध्यापक, वकील की जज, सैनिक कुठला नेव्ही, का स्थळ सेनेचा अशा शन्का येऊ शकतात. त्याचे स्पष्टीकरण असे की, शिक्षक म्हटल्यानंतर तो ज्ञानदान करणारा असला पाहिजे. मग तो ◾️प्रायमरी, माध्यमिक,लेक्चरर हेंडमास्तर, प्रिन्सिपॉल कोणीही असला तरी चालतो.◾️ तसेच डॉक्टर कोणत्याहि क्षेत्रातला असला तरी चालेल.त्यांनी पेशंट तपासले पाहिजेत. ऑपेरेशन करणारे डॉक्टर प्राधान्याने निवडावेत.◾️वार्ताहराचे बाबतीत समाचार पत्राचा संपादकही चालेल.◾️ तसेच सैनिक क्षेत्रात सुरक्षा विभागात कार्यरत असलेला कोणत्याही क्षेत्रातील जातक चालेल.

 उरलेल्या 5 कुंडल्या, आपण आपल्या आवडीप्रमाणे, ओळखीच्या, नातेवाईकांच्या, जवळच्या मित्रांच्या, अशा व्यक्तीच्या घेऊ शकतो.5 नेमून दिलेले विषय, व 5 आपण निवडलेल्या कुंडल्या, अशा एकूण 10 कुंडल्यांचा प्रबंध तयार करावा लागतो.

💠 हा प्रबंध, जरी आपल्याला परीक्षेच्या वेळी सादर करावा लागत असला तरी, वर नमूद केलेल्या 5 व्यावसायिकांचा जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मस्थळ असा तपशील मिळवणे तसेच, इतर आपल्या आवडीप्रमाणे, 5 जातकांचा सुद्धा, जन्म तपशील मिळवणे, हे काम मात्र चिकाटीचे असते. म्हणून त्यासाठी आतापासून कामाला लागलेले बरे.

◾️ त्याकरिता आपल्याला आपल्या जिथे जिथे ओळखी असतील, त्यातून असे जातक शोधावे लागतात. म्हणून, आतापासूनच, तत्परतेने अशा व्यक्तींचा तपशील गोळा करणे, आवश्यक असते. म्हणजे ऐन वेळेला, तपशीला अभावी प्रबंध तयार करण्यास, अडचणी येत नाहीत.

*💠 प्रबंध कसा तयार करावा?*

◾️ सर्वप्रथम जातकाचा स्त्री जातक /पुरुष जातक याप्रमाणे उल्लेख करून, त्याच्या पुढे त्याची जन्मतारीख, जन्मवेळ, व जन्मस्थळ नमूद करणे आवश्यक असते.( दहा कुंडल्यांपैकी जर ही कुंडली विशिष्ट व्यावसायिकाची असेल, तर तसे ठळकपणे कंसात नमूद करावे ). जातकाच्या नावाचा उल्लेख टाळावा.

◾️ त्याचबरोबर मूळ जन्म कुंडलीचा नकाशा आकृती द्यावी.

◾️ नंतर त्या आकृतीतील ग्रहस्थितीचे, प्रत्येक भाव व भावेशानुसार  तपशीलवार वर्णन करावे.

◾️ त्यानंतर चन्द्रकुंडली मांडावी. व तिचे वर्णन करावे.

◾️ नंतर नवांश कुंडलीची आकृती द्यावी. मूळ कुंडलीला अनुसरून, कोणता ग्रह बलवान झाला आहे. कोणता ग्रह वर्गोत्तम आहे, कोणता ग्रह मूळ कुंडलीत बलवान असून, तो नवाशात बलिहीन झाला आहे, त्याचे तुलनात्मक इत्यंभूत वर्णन करावे.

◾️ प्रबंधाकरता निवडलेला जातक,जर आपल्या चांगल्या परिचयाचा असेल, तर त्याच्या जीवनातील अनेक शुभाशुभ  घटना  आपल्याला माहीत असतात. उदाहरणार्थ- कोणाचा प्रेम विवाह झालेला असतो, कुणाचा अपघात ऑपरेशन, प्रेमभंग, घटस्फोट, कोणाला संतान समस्या असतात. जीवनात जर काही अशा समस्या असतील, तर तशी ग्रहस्थिती जन्म कुंडलीतून निश्चितच दिसते. अशा घटनांचे सुद्धा, ज्योतिष्य शास्त्रीय दृष्टिकोनातून, ग्रहस्थिती विशद करणे आवश्यक असते..

◾️ जेव्हा आपण व्यावसायिकाची कुंडली निवडतो, तेव्हा ती व्यक्ती त्या व्यवसायात कोणत्या ग्रहस्थितीमुळे आली. त्याचे परीक्षण सुद्धा, आपल्याला या प्रबंधात आवश्यक असते.

 थोडक्यात सर्वार्थाने त्या व्यक्तीच्या जीवनाचा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. त्याचे संपूर्ण विवेचन, व विवेचनाच्या ओघात संबंधित कुंडल्यांची चित्रे देणे आवश्यक असते.

◾️ अर्थात हा आपला प्रबंधाचा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे, आपल्याला सुरूवातीला कच्च्या वहीवर, क्रमवार, अशा नोंदी करणे सोयीचे असते.

◾️ त्यानंतर पक्का प्रबंध कसा तयार करावा याबद्दलही काही संकेत आहेत.

◾️ आपला प्रबंध A-4 पेपरवर टंकलिखित केलेला असावा. आज काल सगळ्यांकडे मोबाईल आहेत. बऱ्याच जणांकडे  लॅपटॉप संगणक असेल. त्यांना टायपिंगची सवयहि असते. मोबाईल मध्ये असे सॉफ्टवेअर येते की, जे आपण डाऊनलोड केल्यानंतर आपण मोबाईल समोर बोलल्यास आपले बोलणे ऑटोमॅटिकली टाईप केले जाते. त्या सॉफ्टवेअरची माहिती मी या अगोदर दिलेली आहेच . त्यानुसार आपल्याला टाईप करणे सुद्धा सोयीचे होते.

◾️ पक्के टायपिंग करताना फॉन्ट 11 अथवा 12 वापरावा. म्हणजे टाईप केलेले वाचताना डोळ्यावर ताण येणार नाही असा फॉन्ट निवडावा.

◾️ कुंडल्यांची चित्रे देताना ती फार लहान आहे असू नये अथवा फार मोठीहि असू नये. आकृतीत दिलेला तपशील सुलभपणे  वाचता यावा अशा आकाराची आकृती असावी.

◾️ प्रबंध बाइंडिंग करण्यापूर्वी, सर्व कुंडल्या जुळवून घ्याव्या. कुंडलि क्रमांक देताना सर्वप्रथम व्यावसायिकांच्या पाच कुंडल्या घ्याव्यात त्यानंतर कुंडली क्रमांक सहा ते दहा आपण निवडलेल्या व्यक्तीच्या घ्याव्यात .

◾️ एकंदर किती पानाचा आपला प्रबंध झाला आहे, हे लक्षात घेऊन, प्रबंधाची अनुक्रमणिका तयार करावी. प्रबंधाच्या पहिल्या पानावर आपले पूर्ण नाव, आपला कायम पत्ता, मोबाईल क्रमांक,, दिलेला आपला रजिस्ट्रेशन क्रमांक, आपण या अगोदरची परीक्षा उत्तीर्ण केली आहे तिचे नाव, उत्तीर्ण केलेल्या परीक्षेचे दिनांक वर्ष. प्रबंधात सामील असलेल्या कुंडल्यांची संख्या, प्रबंधाची एकूण पृष्ठ संख्या, याचा पूर्ण तपशील असावा.

 या तपशिलाच्या खाली आपली सही असावी.

◾️ प्रबंधाच्या दुसऱ्या पानावर अनुक्रमणिका द्यावी.

 अनुक्रमणिकेचे कॉलम याप्रमाणे असावे -

◾️ कुंडली क्रमांक ◾️जातक स्त्री-पुरुष ( व्यवसायिकाची कुंडली असेल तर व्यवसायाचा उल्लेख करावा )◾️ जन्मतारीख ◾️ जन्मवेळ ◾️ जन्मगाव ( हे गुप्त ठेवावयाचे असल्यास, त्या गावाचे अक्षांश रेखांश लिहावे)◾️  कुंडलीची पाने ◾️ पान क्रमांक - ते - पान क्र.-

◾️ याप्रमाणे कॉलम करून सर्वप्रथम पाच व्यावसायिकांची म्हणून नंतर उरलेल्या पाच असा दहा कुंडल्यांचा तपशील भरावा )

 ◾️अनुक्रमणीकेनंतर, अनुक्रमाणिकेत लिहिल्याप्रमाणे, क्रमवार कुंडल्या लावाव्या. व नंतर पक्के बाईडिंग करावे.

◾️ शक्यतोवर हा प्रबंध दोन प्रतीत करावा. म्हणजे एक प्रत आपण सादर करतो ती व दुसरी आपल्याजवळ कायम राहणारी असते.

💠 एकंदरीत वरील सर्व माहितीवरून, प्रबंधाच्या विषयासंबधी, जातकाचा तपशील मिळवणे, म्हणजेच *प्रबंधाची पूर्वतयारी करणे आता पासूनच आवश्यक आहे हे लक्षात येईल*.

💠 वरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

 म्हणजे आपल्याला प्रबंध तयार करताना अडचणी येणार नाहीत.

💠 मागील अनुभवावरून सांगतो की, काही विद्यार्थ्यांचे मोबाईल बिघडतात, काहींचे मोबाईल हरवतात. अशावेळी त्यांना ऐनवेळी प्रबंध कसा तयार करावा याबाबत नंतर अडचणी येतात. अशी स्थिती उद्भवू नये म्हणून, जर आपण या सर्व सूचना पेन ड्राईव्ह, लॅपटॉप किंवा हार्ड डिस्क यात जर *संग्रहित* करून ठेवल्या तर भविष्यात अशा अडचणी येणार नाहीत.


= पुंडलिक दाते, अकोला

Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली