ज्यो. वाचस्पती -प्रबंध विषयी
*💢 ज्योतिष विद्यावाचस्पती परीक्षा- प्रबंध सादरीकरण विषयी 💢*
नमस्कार!
आपण सर्व ज्योतिष्यप्रेमी विद्यार्थ्यांनी, ज्योतिष्य अलंकार ही परीक्षा उत्तीर्ण होऊन, आता ज्योतिष्य विद्यावाचस्पती परीक्षेसाठी प्रवेश घेतला आहे.
◾️ या परीक्षेसाठीही आदरणीय मॅडम द्वारा प्रसारित झालेले, निर्धारित अभ्यासक्रमावरील युट्युब वरील व्हिडिओ पाहून, मनन करून, चिंतन करून, नोट्स काढून, आपण अभ्यास करणार आहोत.
◾️ तसेच, अलंकार परीक्षा प्रमाणे या परीक्षेतहि *"प्रबंध"* या विषयाचा समावेश आहे. मात्र अभ्यासाचा सराव होण्यासाठी, काठिण्य पातळी वाढविल्यामुळे, या प्रबंधात 50 कुंडल्यांचा समावेश राहील.
◾️ प्रबंधासाठी आपल्याला एकूण पाच विषय दिलेले असून, प्रत्येक विषयाच्या दहा कुंडल्या याप्रमाणे 50 कुंडल्यांचा प्रबंध तयार करावयाचा आहे. तसेच हा प्रबंध, प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी, परीक्षा हॉलवर, आदरणीय मॅडमना सादर करावयाचा आहे.
◾️ या प्रबंधासाठी *(1) प्रेम प्रकरण व त्यातून विवाह (2) कर्करोग (3) संतती योग (4) व वैधव्य / विधुर योग (5) परदेश गमन योग* असे पाच विषय राहणार आहेत.
त्यामुळे, ज्या व्यक्तीच्या जीवनात अशा प्रकारच्या घटना झाल्या आहेत, त्यांची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मस्थळ, असा तपशील मिळवणे आवश्यक आहे. याकरिता आपण आपल्या परिचयातील, नातेवाईक, शेजारी, मित्रमंडळी, वा त्यांच्या ओळखीने जर अशा व्यक्ती असतील तर,त्यांचा तपशील गोळा करावयाचा आहे. अशा 50 व्यक्तींचा संग्रह करणे, त्यांच्या कुंडल्यांचा अभ्यास करणे, व त्यासंबंधी लेखन करणे, याकरिता वेळ व मेहनत बरीच लागते. त्यामुळे, प्रबंध सादरीकरणाची वेळ जरी प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी असली तरी, प्रबंधाची पूर्वतयारी मात्र, आतापासूनच करावयास पाहिजे. तरच आपण निर्धारित वेळेपर्यंत आपला प्रबंध, परिपूर्ण स्वरूपात, सादर करू शकतो.
◾️ प्रबंधाचे लेखन कसे करावे? याचा आपल्याला अलंकार परीक्षेचा अनुभव आहेच.
परंतु, त्या परीक्षेत जातकाच्या जीवनातील अनेक शुभ अशुभ घटनांचा परामर्श घ्यावयाचा होता. यावर्षी मात्र, या प्रबंधात आपल्याला फक्त निवडलेल्या विषयासंबंधीची ग्रहस्थिती, कारक भाव, कारक ग्रह, कारक भावाचा भावेश, त्याची स्थिती, कारक भावातील ग्रह, त्यांचे स्वामित्व, कारक ग्रहाचे नक्षत्र, त्यावरील इतर ग्रहांची दृष्टी, असा सर्व विचार, मुद्देसूद मांडता आला पाहिजे.( इतर घटना विचारात घेतल्यास, पान संख्या वाढू शकते. म्हणून मुख्य विषयाचा विचार करावयाचा आहे.)
◾️ जातकाची जन्मतारीख जन्मस्थळ नमूद करावे. जातक स्त्री का पुरुष ते लिहावे. जातकाच्या नावाचा उल्लेख टाळावा. जन्मगाव हि गुप्त ठेवावयाचे असल्यास जन्म गावाचे अक्षांश रेखांश लिहावे. त्याच्यापुढे या कुंडलीचा कोणत्या विषयाच्या आधारे अभ्यास करणार आहोत, तो विषय ठळकपणे लिहावा.
त्यानंतर जन्म कुंडली, चंद्र कुंडली, नवांश कुंडली, त्या विषयाशी संबंधित असलेले जातकाची वर्ग कुंडली, व सर्वात शेवटी सर्वाष्टक वर्गाचा तक्ता द्यावा. व त्या भावातील एकूण बिंदू, भावेश ज्या स्थानी आहे त्या स्थानातील बिंदू. भावेशाने कारक भावास दिलेले बिंदू याचे सर्व विषयाच्या अनुषंगाने विश्लेषण करावे. या सर्व कुंडल्या मांडताना त्याच्या चित्राबरोबरच त्या चित्रातील ग्रहस्थितीच्या वर्णन करावे. वर निवडलेल्या विषयासंबंधी, संबंधित ग्रह त्यांचे योग काय सुचित करतात, याचे ज्योतिष शास्त्रीय दृष्ट्या विवेचन करावे. मुद्देसूतपणा व शुद्धलेखनावर भर द्यावा. सर्वात शेवटी विषयाची संबंधित ग्रहस्थितीचे त्रोटक वर्णन करावे. जसे- विधुर योगासंबंधी ◾️सप्तमेश अष्टमात.◾️शुक्र क्रूर नक्षत्री इ.
💠 पहिल्यांदा एका कच्चा वहीत जातकाचा तपशील, अभ्यासाचा विषय, हे लिहून जन्म कुंडली चंद्र कुंडली, नवाश कुंडली,विषयाशी संबंधित वर्ग कुंडली, व सर्वाष्टकाचा तक्ता मांडावा. जन्म कुंडलीत ग्रहाचे अंश लिहावे. ◾️कुंडलीत चिन्हांचा वापर कसा करावा याबाबत मी एक स्वतंत्र लेख यापूर्वी ग्रुप वर दिलेला आहे.◾️ त्याप्रमाणे जन्म कुंडली मांडल्यास चटकन ग्रहस्थितीचा अंदाज येतो. म्हणून त्याप्रमाणे मांडणी करावी. या सर्व कुंडल्या एकाच पानावर असल्यामुळे, आपण संबंधित ग्रहस्थितीचा, भावाचा, एकत्रितपणे विचार करू शकतो. व त्याविषयीचे आपले अंदाज आपण त्याच पानावर त्रोटक शब्दात लिहू शकतो. सर्वाष्टक पाहून पण असेच त्रोटक अंदाज लिहू शकतो.
कुंडलीतील विषयाचे समर्थन करणारी ग्रहस्थिती आपल्या पूर्णपणे लक्षात आल्यानंतर, आपण त्याची फेअर कॉपी करायला हरकत नाही.
कुंडलीची पक्की कॉपी करताना, A 4 हा कागद वापरावा. हे कुंडली विवेचन शक्यतो टाईप केलेले असावे. कारण हस्ताक्षरात लिहिलेले असता, कागदांची संख्या वाढते. व तेवढी सुबकता येत नाही. टाईप करताना अकरा किंवा बारा नंबरचा फॉन्ट वापरावा. जेणेकरून वाचताना डोळ्यावर ताण येणार नाही. वर लिहिलेल्या प्रत्येक कुंडलीच्या आकृती द्याव्या. आकृतीचा आकार फार मोठा किंवा फार लहान असू नये, आकृतीत दिलेली माहिती सहजपणे वाचता यावी इतपत मोठी असावी व आकृतीच्या जवळ, त्या आकृतीचे ग्रह वर्णन असावे. त्या कुंडली द्वारा आपल्या विषयाचे समर्थन करणारी कोणती ग्रहस्थिती तेथे दिसते ते वर्णन करावे. सर्व कुंडलीचे विवेचन संपल्यानंतर, कुंडलीच्या शेवटी आपल्या नावाचा उल्लेख करावा.
◾️ अशाप्रकारे सर्व कुंडल्या (50) फेअर झाल्यानंतर, त्या विषयावर व क्रमवार जुळवाव्यात. सर्व कुंडल्याची एकूण पाने किती झालीत ते लक्षात घ्यावे. नंतर प्रबंधाची, विषयवार, अनुक्रमणिका तयार करावी. प्रत्येक विषयाच्या दहा कुंडल्या, त्यांचा तपशील कॉलम करून लिहावा.
जसे प्रेम प्रकरण व विवाह योग
◾️ कुंडली क्रमांक ◾️ जातक/ जातिका ◾️ जन्मतारीख ◾️ जन्मवेळ ◾️ जन्मस्थळ वा अक्षांश रेखांश ◾️ कुंडलीची एकूण पाने ◾️ प्रबंध पान क्रमांक- ते पान क्रमांक -
◾️ प्रबंध बाइंडिंग करण्यापूर्वी, प्रबंधाच्या पहिल्या पानावर, परीक्षेचे नाव,परीक्षेचे वर्ष आपले स्वतःचे नाव, मोबाईल नंबर, संस्थेने आपल्याला दिलेला रजिस्टर क्रमांक, आपला पूर्ण पत्ता, आपण या अगोदर उत्तीर्ण केलेली परीक्षा व तिचे वर्ष, प्रोजेक्टमध्ये समावेश असलेल्या असलेली कुंडली संख्या, प्रोजेक्टची एकूण पाने या सर्व गोष्टी ठळकपणे लिहाव्या. या पानावर, सर्वात शेवटी, आपली सही असावी.
◾️ हे पान सर्वात वर घेऊन, त्याखाली अनुक्रमणिका ( ही 50 कुंडल्यांची असल्यामुळे दोन पानात होईल ) व त्याखाली विषयवार कुंडली क्रमांक एक ते पन्नास अशी रचना करून आपला प्रोजेक्ट बाइंडिंगला द्यावा. प्रोजेक्टचे साधारणपणे पक्के बाइंडिंग असावे. हा प्रोजेक्ट आपण दोन प्रतीत तयार केल्यास, एक प्रत आपण सादर करू शकतो व दुसरी कायम आपल्याजवळ राहते.
वरील सर्व सूचना कटाक्षाने पाळल्यास, आपण आपला प्रोजेक्ट, परिपूर्ण स्वरूपात पूर्ण करू शकतो.
💠 मात्र 50 कुंडल्यांचा तपशील गोळा करावयाचा असल्यामुळे, तत्परतेने आपण आतापासूनच प्रयत्नरत असल्यास, निर्धारित वेळेच्या आतच, आपला प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकतो. कारण आपल्याला, आपली दैनंदिन कामे, परीक्षेचा इतर अभ्यास, इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या, त्यात लागणारा वेळ, व त्यासोबतच हा प्रबंधहि करावयाचा आहे. त्याकरिता, आपण जागरूकपणे, 50 कुंडल्यांचा तपशील गोळा करण्याचे आतापासूनच प्रयत्न करावेत, असे सुचवावे वाटते.
💢 प्रबंध कसा तयार करावा! याची माहिती देणारा हा लेख आपल्या सतत संग्रहि असावा. बरेचदा आपले मोबाईल बिघडतात, वा हरवतात. त्यावेळी केवळ आपण मोबाईल वरच या सूचना ठेवल्या असता त्या गहाळ होतात. तसे होऊ नये म्हणून आपण हा लेख वाही माहिती आपला संगणक लॅपटॉप पेन ड्राईव्ह अशा ठिकाणी सेव्ह करून ठेवावी. म्हणजे अडीअडचणीत ती पुन्हा उपयोगी येऊ शकते.
= पुंडलिक दाते, अकोला
Comments
Post a Comment