कुंडली अभ्यास तंत्र व मंत्र
⚛️ कुंडली अभ्यास - तंत्र व मंत्र ⚛️
ज्योतिष्य विषयक अभ्यास करताना, आपल्याला सतत या विषयावरील वाचन करावे लागते व त्याचबरोबर, अनेक कुंडल्या पाहण्यांचा सुद्धा सराव करावा लागतो. कुंडली अभ्यासाचा सराव करताना, आपण जर योग्य मार्ग निवडला तर, आपल्याला अभ्यासात शीघ्र गती येते.
◾कुंडली मांडताना काय काळजी घेतली पाहिजे, म्हणजे ग्रहांचे स्पष्ट स्वरूप, आपल्या ताबडतोब लक्षात येते. याकरीता, मी काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे.
💢 सर्वप्रथम, जन्मकुंडलीचा विचार करण्यासाठी, आपल्याला कुंडलीचा नकाशा काढून, त्यामध्ये तपशिलानुसार ग्रह भरावे लागतात. ◾ ग्रह लिहिताना, जर आपण त्यांच्या डोक्यावर जर त्यांचे अंश लिहिले तर, त्या ग्रहाची अवस्था, आपल्या पटकन लक्षात येते. किंबहुना, अंश लिहिल्याशिवाय, कुंडलीचा पुढील विचार करूच नये, असे मला वाटते. ◾ कधी कधी, काही ग्रह अस्तंगत असतात. ते चटकन लक्षात येण्यासाठी, आपण त्या ग्रहाभोवती वर्तुळ केलेले कधीही चांगले. ◾ एखादा ग्रह जर वक्री असेल तर, त्याची अवस्था दाखवण्यासाठी त्या ग्रहाच्या पायाखाली, एक विशिष्ट खूण केलेली बरी. ◾ कुंडलित बरेचदा, काही ग्रह क्रूर नक्षत्रात असतात. फलिताचा विचार करताना, ते क्रूर नक्षत्रात आहेत, हे लक्षात येण्यासाठी, त्या ग्रहाच्या खाली, छोटेसे भरीव गोलाकृती चिन्ह केलेले बरे ◾ कुंडलीत काही ग्रह वर्गोत्तम असतात. फलिताचा विचार करताना, ते चटकन लक्षात आले पाहिजे, यासाठी सुद्धा, त्याच्याखाली आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण वेगळी खूण करावी. ◾ एखादा ग्रह, जर नपुसक नक्षत्रात असेल तर, ते पण फलिताचा विचार करताना, लक्षात घ्यावयाला पाहिजे. त्यासाठी आणखी एखादी विशिष्ट खूण निवडावी. ◾ सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वर सांगितल्याप्रमाणे एका विशिष्ट अवस्थेसाठी, आपण ज्या खुणा निवडल्या आहेत, त्याच शेवटपर्यंत, प्रत्येक कुंडलीचा विचार करताना, कायम ठेवाव्यात म्हणजे, मग आपला कधीही गोंधळ होणार नाही.
💢 त्यानंतर नवांश कुंडलीचा विचार करावा.
💢 मूळ कुंडलीत, प्रत्येक भावाचे सर्वाष्टकातील गुण, त्या त्या भावात लिहावे. हे गुण लिहिताना, लाल शाईचा उपयोग करावा. म्हणजे ग्रहाचे अंश व अष्टक वर्गाचे गुण यात आपला गोंधळ होणार नाही.
याप्रमाणे, जर आपण कुंडलीची मांडणी केली तर, प्रत्येक ग्रहाचे स्वरूप स्पष्टपणे लक्षात येते. व फलादेश करताना त्याचा निश्चितच उपयोग होतो.
💢 कुंडल्यांचा अभ्यास करताना, आपल्याला नेहमीच कुंडलीची आकृती काढावी लागते. व त्यात आपला थोडा वेळ जातो. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे, आपण आपल्या अक्षराच्या प्रमाणात, हव्या त्या आकाराचा, एक रबरी शिक्काच बनवून घ्यावा. म्हणजे दरवेळेला तो शिक्का उमटवला की, कुंडली पटकन मांडून होते.
💢 उत्तम अभ्यासकाला, आपण अभ्यास केलेल्या कुंडल्यांचा संग्रह करावासा वाटतो. व तो, पुढे चालून, आपल्या अभ्यासाला खूप मदत करतो.
◾याकरिता एक सोपी युक्ती सांगतो.
💢 दरवर्षी वेगवेगळ्या कंपन्या, नूतन वर्षानिमित्त डायऱ्यांचे वाटप करतात. अशी कोणतीहि , कोणत्याहि वर्षाची डायरी चालेल. तिचा कागद मात्र उत्तम प्रकारचा व टिकाऊ असावा. योगायोगाने, आपल्याकडे जानेवारी ते डिसेंबर बारा महिने, व मेष ते मीन अशा बारा राशी आहेत.◾जानेवारी महिन्यात सर्व मेष लग्नाच्या कुंडल्या, तर डिसेंबर महिन्यात सर्व मीन लग्नाच्या कुंडल्या, याप्रमाणे जर आपण वर्गीकृत करून, त्या डायरीत कुंडल्या लिहिण्याचा सराव ठेवल्यास, पुढच्या अनुभवासाठी असा संग्रह खूप उपयोगी ठरतो.
💢 ज्योतिषाने नेहमी, आपल्यासोबत एक वही ठेवावी व त्यामध्ये अनुक्रमांक, जातक/जातिकेचे नाव,/ जन्मदिनांक/ जन्मवेळ/ जन्मस्थान/ असे कॉलम करून तपशील ठेवावा ( आवश्यक वाटल्यास, सर्वात शेवटच्या कॉलममध्ये, त्याचा मोबाईल क्रमांक लिहावा )◾ कोणत्याहि कुंडलीचा अभ्यास करण्यापूर्वी, सर्वप्रथम, त्या वहीत नोंद करावी. व त्या कुंडलित, अभ्यासाच्या दृष्टीने, काही विशेष आढळल्यास, ती कुंडली, मग आपण आपल्या संग्रहाच्या डायरीत, जातकाचे जे लग्न आहे, त्या महिन्यात, तिची नोंद करावी. त्या नोंद केलेल्या कुंडलीच्या खाली, आपल्या वहीतील नोंद क्रमांक, जातक स्त्री का पुरुष, संक्षिप्त स्वरूपात, त्याची जन्मतारीख, जन्मवेळ जन्मठिकाण लिहावे व त्याच्या नावाची फक्त आद्याक्षरे लिहावी. म्हणजे कालांतराने, आपला घोळ होत नाही. ◾ समजा ती पुरुषाची कुंडली असेल, व पती-पत्नीचे पटत नाही म्हणून, आपल्याकडे ती अभ्यासाला आली असेल, व त्याच्या पत्नीची पण आपल्याकडे कुंडली असेल तर, कदाचित, मुलाचे मेष लग्न असल्यास, तो जानेवारीच्या महिन्यात व त्याच्या पत्नीचे वृश्चिक लग्न असल्यास, तिची कुंडली ऑगस्ट महिन्यात लिहिली जाईल. परंतु त्यासोबतच, जोडीदाराचा कुंडली क्रमांक, त्याचे लग्न, याचा संदर्भ, त्या कुंडलीच्या बाजूला असावा. म्हणजे कधीकाळी, आपल्याला दोन्ही कुंडल्या पाहावयाच्या असल्यास, असा क्रॉस रेफरन्स दिल्यामुळे, आपल्याला त्या सहज सापडतात.
💢 जसजसा, आपला हा कुंडल्यांचा संग्रह वाढेल, तसतसा, आपला अभ्यासाचा आत्मविश्वास वाढेल..
💢 मला वाटते, आपल्याला योग्य वाटल्यास, आपण सर्व या मार्गदर्शक सूचनांचा विचार कराल.
|| शुभम भवतु ||
= पुंडलिक दाते,ज्यो. रत्न अकोला

Comments
Post a Comment